Monday 9 September 2019

अमृतानुभव, शिव शक्ति समावेशन ओव्या १ ते ५





 प्रकरण पहिलें
ऐसीं इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवो देवी ॥१॥


ऐसी ही देखिली
म्या निरुपाधिक
जननीजनक
जगताची ॥
-
विश्व वृक्षाचे जी
जणू काही मूळ
वंदिली कृपाळ
देव देवी ॥

**
जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एका हारीं । एकांगाचा ॥२॥
.
तया शिवाची जी
असे प्राणेश्वरी
तिये प्रेमभरी
वेडावून ॥
-
घेतसे जो उडी
तिच्या स्वरूपात
जाई हरपत
तिये ठायीं ॥
 -
ऐक्याची ही स्थिती
सर्वोच्च साजरी
एकाच शरीरी
नरनारी ॥
**
आवडीचेनि वेगें । येकयेकां गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥३॥
आवडी आवेगी
घालूनियां मिठी
एकरूप प्रीती
अनुभवे ॥
-
एकेकासी ती
जणू की गळती
गमे अशी स्थिती
तया ठायी ॥

किंवा रमण्यात
द्वैताच्या आनंदी
होवू ते पाहती
वेगळाले ॥
**
जे एकचि नव्हे एकसरें । मा दोघां दोनीपण कैचें पुरे ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥४॥
-
पाहता एकची
नव्हे एकसरे
परि द्वैत  सरे
असे नाही ॥
-
जयांचे स्वरूप
पाहता साकार
लागेना तो पार
काही केल्या ॥

**
कैसी खसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं ।
नेदिती मा कौतुकीं । एकपण फुटों ॥५॥
-
कैसी स्वरूपाची
अतीव आवड
अद्वैत बिघाड
होत नाही ॥
-
आनंद विलासी
द्वैत अविर्भाव
परी एक भाव
जात नाही ॥
-
आनंद कल्लोळी
द्वैताचा आभास
तोही परि त्यास
बाध्य नाही ॥



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com  

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...