Sunday 25 July 2021

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  .
*****
आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला 
अभ्यास चालला  लिहूनिया॥१

योगायोग बरा जुळून हा आला 
तेणे या मनाला  तोष झाला ॥२

काय किती कळले आत उतरले  
जरी न उमजले मज लागी ॥३

परी झाली सोबत ज्ञानदेवा संगत 
शब्दांशी खेळत अनायसे ॥४

येणे सुखावलो भुके व्याकुळलो 
दारी मी पातलो मावूलीच्या ॥५

पांडुरंगा दत्ता विक्रांत हा चित्ता
स्वरुपात आता वास करो  ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



)



Saturday 24 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या २६ते ३१ (अभंग५७ ते ६९ ) ॥संपूर्ण संपन्न॥


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या २६ते ३१ (अभंग५७ ते ६९) 
संपूर्ण
💮💮💮💮💮💮 
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ १०-२६ ॥ 

ओहळ नद्यादी
गंगेशी भेटले 
पाणीच जाहले 
गंगेचे की ॥५७

किंवा अंधकार 
जाता भेटायला 
सूर्यची पै झाला 
आपोआप ॥५८

नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी । मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥ १०-२७ ॥ 

कस तो पहावा 
तोवरी सोन्याचा 
जव परिसाचा 
स्पर्श नाही ॥५९

होताची तो स्पर्श 
अवघे पंधरे 
भेसळ न उरे 
तया माझी ॥६०

तैसें जे या अखरा । भेटती गाभारां । ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ १०-२८ ॥ 

तयापरी इया 
शिरूनी अक्षरा 
भेटती गाभारा 
अर्थाचिया  ॥६१

जैसे का हे ओघ 
मिळता सागरा 
तया न दुसरा 
आकार तो ॥६२

जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ १०-२९ ॥ 

अकार उकार 
आणिक मकार 
भेटता ओंकार 
प्रकटतो ॥६३

पन्नासही मात्रा 
भेटती ओंकारा 
आणिक आधारा
वाव नाही ॥६४

सारे चराचर 
भरुनी ओंकार 
आणिक या पर
काही नाही ॥६५

तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी । किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥ १०-३० ॥ 

तैसा ईश्वरास 
अंगुली निर्देश 
वाव करण्यास 
मुळी नाही ॥६६

सारे त्रिभुवन 
असे तो व्यापून 
जाणा कणकण 
शिवरूप॥६७

म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें । सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥ १०-३१ ॥ ॥ 

ज्ञानदेव म्हणे 
सार्‍या प्रेमभावे
अमृतानुभवे 
आनंद हा ॥६८

अवघ्या विश्वाने 
भोगावा आनंद 
होऊन आनंद 
रूपच ते ॥६९


इति श्रीसिद्धानुवाद अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥

 🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

 

Friday 23 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या ,२१ते २५ (अभंग ४७ते ५६ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या ,२१ते २५ (अभंग ४७ते ५६) 
💮💮💮💮💮💮
नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे । हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ १०-२१ ॥ 

जरी नित्य चंद्र 
दिसतो सुंदर 
पौर्णिमे अपार 
शोभा त्याची ॥४७

असो सारी ठिक 
जरी लोक दृष्टी 
परी सूर्यदृष्टी
बोलू का हे ॥४८

प्रिया सावायिली होये । तै अंगीचे अंगीं न समाये । येर्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ १०-२२ ॥ 

अंगना अंगात 
भरून राहते 
तारुण्य सजते 
ठायीची ते ॥४९

परी मिलनाला 
प्रियाच्या सोबत 
अंग न धरत
ओसंडते ॥५०

वसंताचा आला । फळीं फुलीं आपला । गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ १०-२३ ॥ 

जैसा की वसंत 
येताच बागेत 
वृक्ष ये भरात 
आपुलिया ॥५१

फळ व फुलांनी 
भरुनिया जाती 
आकाश चुंबती 
जणू काय ॥५२

ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें । स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ १०-२४ ॥ 

अमृतानुभव 
विवरण ऐसे 
अमृता सरीसे 
आहे खरे ॥५३

स्वानुभवाचे हे
सुंदर पक्वान्ने 
संतासि प्रेमाने
वाढियले ॥५४

आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद । अनुभामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ १०-२५ ॥ 

मुमुक्षु कोणी वा 
असे मुक्त बद्ध
असती हे भेद 
तोवरच ॥५५

जोवरी तयांनी 
यया अमृताला
सुखानुभवाला
चाखिले ना ॥५६

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Thursday 22 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या १६ते२० (अभंग३४ ते ४६ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या १६ते२०  (अभंग३४ ते ४६  ) 
💮💮💮💮💮💮


आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ?
। मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥ १०-१६ ॥ 

आपुले आपण 
स्वरूप वर्णन
सांगू निरूपण 
कोणालागी?॥३४

अणि करूनिया 
करावे अर्पण 
ऐसे  इथे कोण
असे काय?॥३५

अथवा उगाच 
स्वस्थ बसल्यान
होय नुकसान 
अैसे आहे?॥३६

म्हणोनि माझी वैखरी । मौनाचेंहि मौन करी । हे पाणियावरी मकरी । रेखिली पां ॥ १०-१७ ॥ 

म्हणूनिया माझी 
वैखीरी ही वाणी 
होऊनिया मौनी 
उगा राही ॥३७
 
परी हे जे ऐसे
मौनचि राहणे 
मकर रेखणे
पाण्यावरी॥३८

एवं दशोपनिषदें । पुढारी न ढळती पदें । देखोनि बुडी बोधें । येथेंचि दिधली ॥ १०-१८ ॥ 

दशोपनिषिदे 
जी का सांगितली 
तीच ती वदली 
गोष्ट तिथे ॥३९

पाहुनिया ऐसे 
आत्मबोधे येणे 
तयामध्ये मौने
बुडी दिली ॥४०

ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । हें अनुभवामृत । सेंवोनि जीवन्मुक्त । हेंचि होतु ॥ १०-१९ ॥ 

ज्ञानदेव राय 
सांगती प्रेमाने 
दैवी संपदेणे 
पूर्ण ग्रंथ ॥४१

अमृतानुभव जे 
कुणी सेवती 
जीवनमुक्त होती 
खात्रीने ते ॥४२

मुक्ति कीर वेल्हाळ । अनुभवामृत निखळ । परी अमृताही उठी लाळ । अमृतें येणें ॥ १०-२० ॥ 

तर खरंतर मुक्ती 
खूपच वेल्हाळ 
साधक चोखळ 
वस्तू असे ॥४४

परी या ग्रंथाची 
अनुभवामृताची 
गोडी अपूर्वची 
आहे येथे ॥४५

अहो त्या मुक्तीला 
अन अमृताला 
सुटते तोंडाला 
पाणी येथे ॥४६

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵ो

Wednesday 21 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या ११ते १५ (अभंग२२ ते ३३)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या ११ते १५ (अभंग२२ ते ३३) 
💮💮💮💮💮💮

ययापरौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं । आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ १०-११ ॥ 

याहून काही ते
नाहीच आण रे 
रहस्य वेगळे 
जनात या ॥२२

प्रतिप्रदानाच्या 
आधीही ते होते 
नव्याने न  होते
सिद्ध काही ॥२३

तर्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो । तर्ही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ १०-१२ ॥ 

तर मग कोणी 
इथे म्हणू पाहे 
ग्रंथ लिहणे हे 
कशासाठी ॥२४

घडला अथवा 
नच वा घडला 
आरंभ कशाला 
मांडला हा ॥२५

(तयासी उत्तर 
देती ज्ञानदेव 
मनी प्रेम भाव 
धरुनिया ॥२६)

होते जे का सिद्ध 
त्याचा अनुवाद 
आवडी भरात 
केला आहे ॥२७

पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची । म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ १०-१३ ॥ 
आवडती वस्तू 
तिच ती असते
भोगतांना गोडी 
अवीट ची ॥२८

म्हणून या इथे 
उचित हे पाहे 
अनुवाद आहे 
केला सिद्ध ॥२९

या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलूनियां । ऐसें नाहीं आपसया । प्रकाशुचि ॥ १०-१४ ॥ 

याच कारणे मी 
जरी मी बोललो
गौप्य न सांगतो
गोष्ट काहि ॥३०

आधीच रे गोष्ट
ही स्वयंप्रकाश 
दावणे प्रकाश 
नाही निज ॥३१

आणि पूर्णअहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों । मा लोपलों ना प्रगटलों । कोणा होऊनी । १०-१५ ॥ 
अहंता हरलो 
पूर्णता पावलो 
सर्वत्र दाटलो 
मीच जरी ॥३२

कोणाच्या अपेक्षे- 
मुळे न लोपलो
किंवा प्रकटलो
काही होत ॥३३

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Tuesday 20 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या ६ते१० (अभंग ११ते २१ )

 
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या ६ते१०  (अभंग ११ते २१  ) 
💮💮💮💮💮💮

म्हणोनि हें असंवर्य । दैविकीचें औदार्य । वांचोनि स्वातंतर्य । माझें नाहीं ॥ १०-६ ॥ 


ऐसे गुरुराया 
आपले सामर्थ्य 
दैवीक औंदर्य 
अनावर ॥११

तयाचेनि योगे
चाले निरूपण 
स्वतंत्र कवन 
माझे नाही ॥१२

आणि हा येवढा ऐसा । परिहारु देवू कायसा । प्रभुप्रभावविन्यासा । आड ठावूनी ॥ १०-७ ॥ 

आणिक इतुका 
परिहार मिया 
जातोसे कराया 
बरे नाही ॥१३

गुरूच्या सामर्थ्या
ऐसे या बोलणे
लघुत्व आणणे 
होईल गा ॥१४

आम्ही बोलिलों जें कांहीं । तें प्रगटची असे ठायीं । मा स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावें बोलें ? ॥ १०-८ ॥ 
आणिक इतुके
बोललो जे काही
 प्रकटच पाही 
स्वयं ठायी  ॥१५

स्वयं प्रकाशा या
शब्दाने बोलून 
दावी प्रकाशून 
काय कुणी ॥१६

नाना विपायें आम्हीं हन । कीजे तें पां मौन । तरी काय जनीं जन । दिसते ना ? ॥ १०-९ ॥ 

आणि आम्ही तर 
काही कारणेन
धरीयेले मौन 
तया ठाई  ॥१७

तर काय जन
जना न पाहती 
सारे ठोठावती 
व्यवहार ॥१८

जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां । कोण्ही नहोनि आइता । सिद्धांत हा ॥ १०-१० ॥ 

जेधवा पाहती 
जन ते जनास 
कोण ते कोणास 
पाहतसे ॥१९

दृष्टाचि आपण 
दृश्य ते होऊन 
घेतसे पाहून 
आपणाला ॥२०

ऐसी या ग्रंथात 
जाहली उकल
सिद्धांत सकल 
पाहतसा ॥२१

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Monday 19 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १० वा ग्रंथपरिहार ओव्या ,१ते ५ (अभंग १ते१० )

प्रकरण दहावें ग्रंथपरिहार
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १० वा  ग्रंथपरिहार ओव्या ,१ते ५ (अभंग १ते1१०   ) 
💮💮💮💮💮💮

परी गा श्रीनिवृत्तिराया । हातातळीं सुखविलें तूं या । तरी निवांतचि मियां । भोगावें कीं तें ॥ १०-१ ॥ 

डोक्यावर हात 
माझिया ठेवुनी 
निवृत्ती नाथांनी 
सुखी केले ॥१

सुखाच्या राणीवे 
बसुनी निवांत 
राहावे भोगत 
सुख तेची ॥२

परी महेशें सूर्याहातीं । दिधली तेजाची सुती । तया भासा अंतर्वर्ती । जगचि केलें ॥ १०-२ ॥ 

परी महेशाने 
दिली सूर्याहाती 
सूत्रे तेजाची ती 
सांभाळाया ॥३

तया त्या तेजाने 
जाहला प्रकाश 
अवघ्या विश्वास 
काठोकाठ ॥४

चंद्रासि अमृत घातलें । तें तयाचि कायि येतुलें । कीइं सिंधु मेघा दिधले । मेघाचि भागु ॥ १०-३ ॥ 

चंद्राला अमृत 
दिधले ईशाने 
का त्या एकट्याने 
भोगावया ?॥५

अथवा सिंधूने 
मेघा दिले जल 
ठेवण्या जवळ 
तयाची का? ॥६

दिवा जो उजेडु । तो घराचाची सुरवाडू । गगनीं आथी पवाडु । तो जगाचाची कीं ॥ १०-४ ॥ 

दिव्याचा प्रकाश 
फक्त का दिव्यास 
अवघ्या घरास 
मिळेची तो  ॥७

गगन विस्तार 
नसे गगनाचा 
अवघ्या विश्वाचा 
त्यात वाटा ॥८

अगाधेंहि उचंबळती । ते चंद्रीचि ना शक्ती ? । वसंतु करी तैं होती । झाडांचें दानीं ॥ १०-५ ॥ 

अफाट सागर 
अपार भरती 
चंद्राची ती शक्ती 
असेचि ना ॥९

वसंत येताच 
वृक्ष होती दानी 
परी ती करणी
वसंताची ॥१०
🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Sunday 18 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ६६,ते७१ (अभंग १३९ते १५१ ) ९ .अ.संपूर्ण

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ६६,ते७१  (अभंग १३९ते १५१  ) 
💮💮💮💮💮💮
 चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें । आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ ९-६६ ॥ 

असता जागृत 
जागविले मजला 
असता झोपला 
झोपविले ॥१३९

आणले आम्हाला 
निजाच्या घराला 
ऐसिया नवला 
दावियले ॥१४०

आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें । हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ ९-६७ ॥ 

जरी आम्ही आहो 
निखळ ते तुझे 
प्रेमे म्हणे माझे 
तरी तूच ॥१४१

ऐसे हे बोलणे 
पुन्हा रे सांगणे 
तुलाच शोभणे 
घडे प्रभू ॥१४२



कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी । कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ ९-६८ ॥ 

कुणाचे तू काही 
दिसशी न घेता 
कुणास ते देता 
किंवा काही ॥१४३

परी भोगे कैसा
गौरव एतुला
गुरु शिष्यातला 
आश्चर्य चि ॥१४४

गुरुत्वें जेवढा चांगु । तेवढाचि तारूनि लघु । गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥ ९-६९ ॥ 

गुरुत्वे चांगला 
समर्थ तू भला 
तारण्या सर्वाला 
लघु झाला ॥१४५

लघुगुरू भेद 
कळेना तयाला 
तव स्वरूपाला 
जाणे ना जो ॥१४६

शिष्यां देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे । तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ ९-७० ॥ 

आपुल्या शिष्याला 
ज्ञानाचे भांडार 
वाटता अपार 
जरी प्रेमे ॥१४७

वाटतांना परी 
अद्वैत मोडेना 
एकत्व सोडेना 
काही केल्या ॥१४८

म्हणुनिया शास्त्रे 
होऊनिया भाट
कीर्तीला गातात 
तुझ्या प्रभू ॥१४९

किंबहुना ये दातारा । तूं याचा संसारा । वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ९-७१ ॥ 

फार काय सांगू 
निवृत्ती दातारा 
सांडिले संसारा
मी तू पण ॥१५०

झालास सोयरा 
माझा प्रियकर 
आनंद अपार 
होई येणे ॥१५१

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥


Saturday 17 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६१ते६५ (अभंग१२९ ते१३८ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६१ते६५ (अभंग१२९  ते१३८  ) 
💮💮💮💮💮💮

कोण्ही एक अकृत्रीम । भक्तीचें हें वर्म । योगज्ञानादिविश्राम । भूमिके हे ॥ ९-६१ ॥ 

असे सहजच 
भक्तीचे हे वर्म  
पूर्ण अकृत्रिम 
तया  ठाई ॥१२९

योग ज्ञान आदी 
येतात विश्रांती 
ऐसी आत्मस्थिती
पावे गा तो ॥१३०


आंगें कीर एक झालें । परी नामरूपाचे मासले । होते तेही आटले । हरिहर येथें ॥ ९-६२ ॥ 

एकच असून 
हरी हर भेद 
नामरुपी त्यात 
पडलेला ॥१३१

तेवी ते आटले 
एकरूप झाले 
भेदची सरले 
उपासने ॥१३२

अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें । ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥

जैसे अर्धनारी 
आणि नारेश्वर 
गिळी परस्पर 
दिसतात ॥१३३

गिळता गिळता 
गिळणे सरते 
काहीच नुरते 
तया ठाई ॥१३४

 वाच्यजात खाऊनी । वाचकत्वहि पिऊनी । टाकली निदैजोनी । परा येथें ॥ ९-६४ ॥

खाऊन टाकले 
"वाच्य" जे का होते 
गिळून वाचेते 
सांगणाऱ्या ॥१३५

होती का राहिली 
परा जी ही वाणी 
गेली ती निजून 
स्वस्थ ऐसी ॥१३६

 शिवाशिवा ! समर्था स्वामी । येवढीये आनंदभूमि । घेपे दीजे एकें आम्हीं । ऐसें केलें ॥ ९-६५ ॥

कल्याण कारक 
श्री सद्गुरुनाथे 
श्री स्वामी समर्थे 
ऐसे केले ॥१३७

महान ऐसिया 
आनंद भूमिला 
आम्हा व्यवहारा 
योग्य केले ॥१३८

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या५६ ,ते ६० (अभंग ११७ ते १२८ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या५६ ,ते ६० (अभंग ११७ ते १२८  ) 
💮💮💮💮💮💮

ना समोर दिसे शिवुही । परि देखिलें कांहीं नाहीं । देवभक्ता दोही । एकुचि पाडू ॥ ९-५६ ॥ 

आणिक तयाला 
जरी हो दर्शन 
दर्शना वाचून 
तरीही तो ॥११७

शिवरूप होता 
देव आणि भक्त 
पाहण्याची मात 
हरवली ॥११८

आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे । तेणें उदळतां दाटे । आपणपांचि ॥ ९-५७ ॥ 

आपल्या हातून 
चेंडू जसा सुटे
आणिक आपटे 
भूमीवरी ॥११९

आपटता खाली 
पुन्हा तो उडतो 
आणिक बसतो 
पुन्हा खाली ॥१२०

घडे सर्व जरी 
वरखाली होणे 
चेंडू चेंडूपणे 
स्थिर असे ॥१२१

ऐसी जरी चेंडूफळी । देखिजे कां केव्हेळीं । तरी बोलिजे हे सरळी । प्रबुद्धाची ॥ ९-५८ ॥ 

जर कोणी पाही 
चेंडू फळी खेळ 
तयाला सरळ 
कळो येई ॥१२२

प्रबुद्धा ची स्थिती 
स्थिरची असती 
जरी का दिसती 
हलतांना ॥१२३


कर्माचा हातु नलगे । ज्ञानाचेंही कांहीं न रिगे । ऐसीचि होतसे आंगें । उपास्ति हे ॥ ९-५९ ॥ 

काय सांगू पुन्हा 
त्याची उपासना 
हाताला लागेना 
कर्माच्या ती ॥१२४

ज्ञानाचा प्रवेश 
होत असे तिथे 
सहज घडते 
तरी सुद्धा ॥१२५


निफजे ना निमे । आंगें आंग घुमे । सुखा सुख उपमे । देववेल यया ॥ ९-६० ॥ 

ऐसी उपासना 
नच केली जाते 
किंवा नष्ट होते 
तया ठाई ॥१२६

जैसे असे काही 
देहची देहात 
सुखची सुखात 
नांदतात ॥१२७

तयापरी घडे 
काही उपमा ती 
तया साधनेती
ज्ञानियाच्या ॥१२८

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Thursday 15 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,५१ते५५ (अभंग१०३ ते ११६ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,५१ते५५  (अभंग१०३ ते ११६   ) 
💮💮💮💮💮💮

 म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे । निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥ 

उपनिषदे ही 
जे काही बोलती 
निंदाच गमती 
जणू काही  ॥१०३

वर्णनातीत जी 
असे काही स्थिती 
बोलता शब्दाती 
निंदाच ना ॥१०४

म्हणता म्हणत
निंदा या शब्दास 
स्तुतिचाच भास
होतो काही१०५

असे शब्द काही 
निंदा म्हणून ती  
स्तुतीच दिसती 
जणू काही ॥१०६

अवघे जगत 
हे परमात्म्यात 
शब्दही तयात 
असतात ॥१०७

तयाहून  इथे 
वेगळे न काही 
स्तुति  नि निंदाही 
वेगळी ना ॥१०८

ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती । मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ ९-५२ ॥ 

होताच समाप्ती 
निंदा आणि स्तुती 
दोन्ही ती जाती 
मौनातच ॥१०९

बोलणे जाहले 
किंवा न जाहले 
मौनाची ठाकले 
होऊनिया॥११०

घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय । शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ ९-५३ ॥ 

जातो ब्रह्मज्ञानी 
कुठल्याही पथी 
तयाते घडती 
शिव यात्रा ॥१११

जरी शिवालया 
गेला तो न गेला 
मुळ त्या स्थितीला 
चळेचिना ॥११२

चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक । नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ ९-५४ ॥ 

खरं तर असे 
चालणे बसणे 
दोन्हीही आनाने 
व्यक्ती ठाई ॥११३

परंतु कौतुक 
दिसे यया ठाई 
एकच ते होई 
जणू काही ॥११४

येर्हवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥ 

एरवी तरी तो 
जिथे जिथे पाहे 
तिथे तिथे आहे 
शिवरूप ॥११५

म्हणूनिया तया 
भलतिया स्थळा 
भलतिया वेळा 
दर्शन ते ॥११६

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Tuesday 13 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,४६ते ५० (अभंग९४ ते १०२ )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,४६ते ५० (अभंग९४ ते   १०२ ) 
💮💮💮💮💮💮

 दीप्तीचीं लुगडीं । दीपकळिके तूं वेढी । हें न म्हणतां ते उघडी । ठाके काई ? ॥ ९-४६ ॥ 

दीप्तीचे लुगडे 
ओढ हे ज्योतीला 
कोणी सांगायला 
लागते का ॥९४

अन्यथा उघडी 
राहशील बाई 
बोलणे हे पाही 
व्यर्थ तैसे॥९५

कां चंद्रातें चंद्रिका । न म्हणिजे तूं लेकां । तर्ही तो असिका । तियाचि कीं ना ॥ ९-४७ ॥ 

किंवा का म्हणावे 
चंद्राला पांघर 
चांदणे सुंदर 
अंगावरी ॥९६

अहो तो सकळ 
चांदणे लेवून 
असतो होऊन 
स्वतः ठायी॥९७

आगीपण आगी । असतचि असे अंगीं । मा कासयालागीं । देणें न देणें ? ॥ ९-४८ ॥ 

असे आगी अंगी 
सदैव ची आग 
तिला काय आग 
कोणी द्यावी ॥९८

म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? । ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥ 
भजन ते होते 
भजन करता 
नच वा करता 
नाही होते ? ॥९९

अहो शिवरूप 
भक्त तो अभक्त  
संयुक्त सतत
भजे वा न ॥१००


अतां भक्ति अभक्ति । झालें ताट एके पातीं । कर्माकर्माचिया वाती । काल्हावूनियां ॥ ९-५० ॥

कर्म कर्माच्या 
असती ज्या वाती 
मावळून जाती 
आपोआप ॥१०१

अन् मग तेथे 
भक्ती व अभक्ती 
ताटात जेवती
एकाच गा ॥१०२

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Monday 12 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ४१,ते४५ (अभंग ८३ ते ९३ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ४१,ते४५  (अभंग ८३ ते ९३  ) 
💮💮💮💮💮💮

आतां देवातेंचि देवें । देववरी भजावें । अर्पणाचेनि नांवें । भलतिया ॥ ९-४१ ॥ 

आणि जर मग 
देवाने देवाला 
देवत्वे भजला 
पूर्णपणे ॥८३

अर्पण साहित्य
आणिक अर्पण 
तोच तो संपूर्ण 
होवुनिया॥८४

पाहें पां आघवया । रुखा रुखचि यया । परी दुसरा नाहीं तया । विस्तार जेवीं ॥ ९-४२ ॥ 

पान फुले फळे 
वृक्षाचा विस्तार 
वृक्षाची मोहर 
तयावर ॥८५

तिये वृक्षाहून 
होणे न वेगळ 
अवघे केवळ 
वृक्ष ऐसे॥८६

देव देऊळ परिवारु । कीजे कोरुनि डोंगरु । तैसा भक्तीचा व्यवहारु । कां न व्हावा ? ॥ ९-४३ ॥

एकच डोंगरी 
कोरुन पाषाण 
देवळ करून 
देव केला ॥८७

ऐसा हा भक्तीचा 
घडे व्यवहार 
शंका तयावर 
का ती घ्यावी॥८८


अओ मुगीं मुग जैसें । घेतां न घेतां नवल नसे । केलें देवपण तैसें । दोहीं परी ॥ ९-४४ ॥

मुक्याने मौन जे 
जरी का घेतले 
नाही वा घेतले 
तरी काय ॥८९

देवता पुजली 
किंवा न  पुजली 
देवत्व पावली 
आत्मस्थिती॥९०

तया त्या ज्ञानाचे 
अवघे करणे 
नच वा करणे 
काही नाही॥९१

 अखतांचि देवता । अखतींचि असे न पूजितां । मा अखतीं काय आतां । पुजो जावी ॥ ९-४५ ॥

अक्षतांचा देव
कोणी जर केला
अक्षते पुजला
जरी काही॥९२

जर का तिचे हे
रूपची अक्षता 
पुन्हा का अक्षता 
वाहव्या त्या॥९३

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Saturday 10 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३६ते ४० (अभंग७२ ते ८२ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३६ते ४० (अभंग७२  ते ८२  ) 
💮💮💮💮💮💮

भलतेउनि देवें । भलतेन भक्त होआवें । बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ ९-३६ ॥ 

कुणी व्हावे देव 
कुणी व्हावे भक्त 
नाही बिघडत 
काम काही ॥७२

ऐसा हा भाग्याचा 
अकर्मू थोरला 
राणीवी बैसला 
जणू तेथे॥७३

देवाचिया दाटणी । देऊळा झाली आटणी । देशकाळादि वाहाणीं । येईच ना ॥ ९-३७ ॥ 

देव वाढुनिया 
सर्वव्यापी झाला 
काम ते देवळा 
नसे मग ॥७४

केवळ चैतन्य 
असे वस्तू पाही 
देश काळ नाही 
तया प्रति॥७५

देवीं देवोचि न माये / मा देवी कें अन्वयो आहे ? । येथ परिवारु बहूये । अघडता कीं ॥ ९-३८ ॥

देवात राहीना 
देवाचा विस्तार 
द्वैताला आधार 
कैसा मग ॥७६

तर मग देवी 
सर्व ही प्रकृती 
राहू का शकती
तयामध्ये ॥७७

अवघा मायेचा 
गमतो व्यापार 
आणि परिवार 
घडेची ना ॥७८

 ऐसियाहि स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठलीं श्रद्धा । तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ ९-३९ ॥

ऐसी या स्थितीत 
वाटे तया देवे 
आपण ची व्हावे 
स्वामी भृत्य॥७९

मग तो ची बने 
गुरु शिष्य देख 
नोकर मालक 
लीला येणे ॥८०

 अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा । नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ ९-४० ॥ 

मग तया नाही 
जप तप ध्यान 
उपचार आण 
उरलेला ॥८१

नुरतो संसार 
नुरतो निर्धार 
तुटतो व्यापार 
देवाविन ॥८२

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Friday 9 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३१ते३५ (अभंग ६१ते ७१ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३१ते३५  (अभंग ६१ते ७१  ) 
💮💮💮💮💮💮

 घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ 

घरातल्या घरी 
चाले जर कुणी 
वाट ती होऊनी 
घर राहे ॥६१

आणि बसलासे 
घरात थकुनी
प्राप्तव्य होऊनी 
घर असे ॥६२

तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां । ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ ९-३२ ॥

जीवनमुक्त तो
करे भलतेही 
तया प्राप्त काही 
करणे ना ॥६३

आणि जर त्याने 
केले नाही काही 
मिळवणे तेही 
राहिले ना॥६४


 आठवु आणि विसरु । तयातेंही घेऊं नेदी पसरु । दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ ९-३३ ॥ 

आत्मस्थितीची त्या 
त्याला आठवण 
किंवा विस्मरण 
होत नाही ॥६५

अशा विलक्षण 
असे तो स्थितीत 
दिसतो घटित 
व्यवहार ॥६६

झाला स्वेच्छाचि विधि । स्वैर झाला समाधि । दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ ९-३४ ॥ 

तया जे इच्छित 
करावे वाटते 
तेच ते लिहते
विधि हाती ॥६७

आणिक वर्तन
तयाचे घडते 
समाधी तयाते
म्हणतसे ॥६८

मोक्षाचे ऐश्वर्य 
हे तया आसन
राहिला बसून 
त्यावरी तो ॥६९

झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु । होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥

ऐसी या स्थितीत 
घडून एकत्व 
देवची तो भक्त 
होय जणू ॥७०

मुक्कामाचे स्थान 
होय जणू पंथ 
आणिक एकांत 
विश्व सारे ॥७१

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Thursday 8 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,२६ते ३० (अभंग ४९ ते ६०)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,२६ते ३० (अभंग ४९ ते ६०) 
💮💮💮💮💮💮


 चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें । विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ ९-२६ ॥

चंद्र जर गेला 
वेचाया चांदणे 
काय त्या वेचणे 
म्हणावे गा ॥४९

विचार येतात 
विचार जातात 
लाभ काय त्यात 
कुणा असे॥५०

 प्रत्याहारादि अंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं । तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ ९-२७ ॥ 

प्रत्याहार आदी
योगाची साधन 
येतात शरण 
तया योग्या ॥५१

योग साधनेही 
ज्ञानीया पुढती 
चंद्रची दिसती 
दिनमानी ॥५२

येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ ९-२८ ॥

ऐशीया स्थितीची 
प्राप्ती जै घडते 
आयुष्य सरते 
प्रवृत्तीचे ॥५३

आणिक सहज 
मग प्रवृत्तीते
जणू शोभा येते 
तया ठायी ॥५४

यया ज्ञानियाचा 
दिसतो घटीत 
व्यवहार नीट 
चाललेला ॥५५

चाले परी कैसा 
दृष्टी अंतर्मुख 
नाही सुख दुःख 
तिळमात्र ॥५६

 द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण । भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ ९-२९ ॥ 

द्वैताच्या अंगणी 
अद्वैत चाकरी 
वाटतसे करी 
आपलीच ॥५७

वाढविला भेद 
जितुक्या पटीत 
वाढ अभेदात  
दुणी होय ॥५८

कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा । झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ ९-३० ॥

कैवल्याहून ती 
असे त्याची स्थिती 
परी दिसे वृत्ती 
विषयात  ॥५९

अभेद भक्तीचा 
जणूकी घटात 
देव आणि भक्त 
ऐक्य होय ॥६०

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Wednesday 7 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या २१ते २५ (अभंग३९ ते ४८ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या २१ते २५ (अभंग३९ ते ४८  ) 
💮💮💮💮💮💮

व्यापाराचे गाडे । मोडतांहि अपाडे । अक्रियेचें न मोडे । पाऊल केंही ॥ ९-२१ ॥ 

घडती हातून 
अनंत व्यापार 
नच व्यवहार 
घडे परी ॥३९

स्थूलपणे दिसे 
जरी काहीबाही 
बाधा येत नाही 
अकर्तृत्वा ॥४०

पसरूनि वृत्तीची वावे । दिठी रूपातें दे खेवें । परी साचाचेनि नांवे । कांहींचि न लभे ॥ ९-२२ ॥

उठताच वृत्ती 
सवे तिच्या दृष्टी 
पाहण्या धावती 
आकाराला ॥४१

परी पाहू जाता 
पाहणे धावणे 
काहीच घडणे 
नसे तिथे ॥४२

 तमातें घ्यावया । उचलूनी सहस्र बाहिया । शेवटीं रवी इया । हाचि जैसा ॥ ९-२३ ॥ 

अंधार घेण्यास 
वर उचलूनी
सहस्त्र बाहूनी 
सूर्य निघे॥ ४३

परी शेवटी तो 
एकटा उरतो
अंधार नसतो
तयासाठी ॥४४

स्वप्नींचिया विलासा । भेटईन या आशा । उठिला तंव जैसा । तोचि मा तो ॥ ९-२४ ॥ 

स्वप्नीच्या विलासा 
रंगुनिया कुणी 
मिठी त्या उठूनी
देऊ जाय ॥४५

परी उठताच 
तोच तो एकला
स्वप्न जो जाहला
होता स्वये ॥४६

तैसा उदैलया निर्विषयें । ज्ञानी विषयी हों लाहे ? । तंव दोन्ही न होनी होये । काय नेणों ॥ ९-२५ ॥

मनात उदित 
स्थिती निर्विषय 
कुठून विषय 
धरी तया ॥४७

विषयी विषयी 
दोन्हीच्या पल्याड 
नसे द्वैत चाड 
ज्ञानिया त्या ॥४८

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Tuesday 6 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१६ते२० (२८अभंग ते ३८ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१६ते२०  (२८अभंग ते  ३८ ) 
💮💮💮💮💮💮
 म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात । घ्यावया जेथ । उजू होती ॥ ९-१६ ॥ 

म्हणूनिया इथे 
शब्द रस आदी
विषय जे होती 
पाच मुख्य ॥२८

तयाचे ग्रहण 
करण्या प्रवृत
ज्ञानेन्द्रिय हात 
जणू होती ॥२९

तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे । मग असतेंचि आहे । संबंधु ना ॥ ९-१७ ॥ 

जरी त्या ठिकाणी 
इंद्रिया विषयी 
संकर्प जै येई
वा न येई॥३०

जाणीव रूपाने 
असे तिथे व्यक्त 
आत्मतत्त्व फक्त 
अस्तित्वात ॥३१

जिये पेरीं दिसती उशीं । तिये लाभती कीं रसीं । कांति जेवीं शशीं । पुनिवेचिया ॥ ९-१८ ॥ 

जेवढ्या लांबीची 
पेरे ती ऊसाची
तेवढी रसाची 
उपलब्धी ॥३२

जेवढ्या कला त्या
असती चंद्राशी 
दिसे पौर्णिमेसी
एक झाल्या॥३३

पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं झालें वरिषणें । विषयां करणें । भेटती तैशीं ॥ ९-१९ ॥ 

पडे चंद्रावरी
जितुकी चांदणे 
चंद्रच ते होणे 
आपोआप ॥३४

जितुका पाऊस 
पडे सागराती
पाणी पाणीयाती 
मिळतसे ॥३५

इंद्रिया विषयी 
ऐसी भेट घडे 
फरक न पडे
कश्यातही॥३६

म्हणोन तोंडाआड पडे । तेंहि वाचा वावडे । परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ ९-२० ॥ 

बोले जरी काही 
तयाची ती वाणी 
बोलती न मौनी 
तरीसुद्धा ॥३७

समाधी तयाची 
मौन त्या मुद्रेची 
असे स्थिरत्वाची 
सर्वकाळ॥३८
🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Monday 5 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,११ते १५ (अभंग१९ ते २७ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,११ते १५ (अभंग१९ ते २७   ) 
💮💮💮💮💮💮

परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे । तैसे झाले धांवे । वृत्तीचे या ॥ ९-११ ॥ 

जशी काय दृष्टी 
शिवे आरशाला 
त्याच त्या क्षणाला 
फिरे मागे ॥१९

तयाची प्रमाणे 
इंद्रिय वृत्तींचा 
विषय भोगाचा 
व्यवहार॥२०

नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥ 

नाग मुदी आणि
लेणे कंकणाचे 
वेगळे तयाचे 
लिंग रूप ॥२१

अन अलंकार 
जरी घेऊ जाता 
सोने  येते हाता 
प्रत्यक्षात ॥२२

वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ । तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ ९-१३ ॥ 

हाती घेता जावे 
पाण्याचे कल्लोळ 
हातात केवळ 
पाणी येते॥२३

हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु । जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ ९-१४ ॥

स्पर्शते हातास 
डोळ्याने रूपास 
जिभेने चवीस
काही कळे॥२४

 तर्ही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें । तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ ९-१५ ॥

परी तो कापूर 
तयाच्या ठिकाणी 
सुगंधा वाचूनी 
काय असे ॥२५

तयापरी बहु 
दिसे रुप गुणे 
गोष्टी त्या आनाने 
प्रत्ययासी॥२६

परी मूळ असे 
एक आत्मतत्त्व 
स्फुरण  रूपात 
ज्ञानमय ॥२७


🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Saturday 3 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६ते १० (१०अभंग ते १८ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६ते १०  (१०अभंग ते १८  ) 
💮💮💮💮💮💮

चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ । रस झाले सकळ । रसनावंत ॥ ९-६ ॥ 

आंब्याची कोवळी
पाने हो कोकीळ 
वा मलयानिल 
अंग स्वतः ॥१०

षडरस सारे 
होऊनिया भोक्ते 
आप आपणाते 
चाखू जाती॥११

तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ ९-७ ॥ 

तया परी इथे 
भोग्य अन भोक्ता 
दिसणे देखता 
एक रूप ॥१२

सरुनिया द्वैत 
हरुनिया भेद 
अखंड ब्रम्हात 
एक रस ॥१३

सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी । पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ ९-८ ॥ 

अगा शेवंतीस 
हजार पाकळ्या 
जरी का असल्या 
शोभीवंत ॥१४

तरी त्या शेवंती -
पण न टाकती
धरुनी राहती 
सर्वकाळ॥१५

तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी । अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ ९-९ ॥ 

लाख उपजले 
जरी भोग्य भोक्ता 
नवनव्या सत्ता-
मध्ये जरी ॥१६

अक्रियेच्या गावी 
परी ब्रह्मवेत्ता 
क्रिया ती तत्वता 
घडेचिना॥१७

म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे । सैंघ घेती धांवे । समोरही ॥ ९-१० ॥ 

जरी का दिसती 
इंद्रिय धावती 
विषय सेविती 
पूर्ण येथे ॥१८

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१ते५(अभंग १ते ९) 💮💮💮💮💮💮


प्रकरण नववें जीवन्मुक्तदशाकथन (सुरवात)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१ते५(अभंग १ते ९) 
💮💮💮💮💮💮 

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले । आरिसे उठले । लोचनेसी ॥ ९-१ ॥ 

जसे काही इथे 
गंध नाक झाले 
शब्दास फुटले 
कान किंवा ॥१

अथवा आरसा 
जाहला पाहता 
होऊन या स्वतः 
डोळाची की॥२


आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें । कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ ९-२ ॥ 

वायु होऊनिया 
पंखा सुंदरसा 
आप आपणसा
वारा घेई ॥३

अथवा मस्तक 
फुल ते चाफ्याचे 
होऊन शोभेचे
नांदू लागेल॥४

जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे । चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ ९-३ ॥ 

जर काय जिव्हा
रसरूप झाली 
कमळ फुलली 
सूर्य रूपे ॥५

आणिक चकोर 
स्वतः चंद्र झाले 
होते आतुरले 
चांदण्यास॥६

फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर । जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ ९-४ ॥ 

सुंदर सुमने 
जाहली भ्रमर 
तरूणीच नर 
जर इथे ॥७

आणिक थकला 
निद्राळू थोरला 
स्वतः जाहला 
शेज जणू॥८

दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा । घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ ९-५ ॥ 

सोन्याची लगड
ठेविली सुंदर 
होय अलंकार 
रेखीवसे ॥९

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Thursday 1 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २५१ते २५५ (अभंग ५३८ ते ५४६)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २५१ते २५५ (अभंग ५३८ ते ५४६) 

हा येणें पाहिला आइसा । कांहीं न पाहिला जैसा । आणि न पाहतांहि अपैसा । पाहणेंचि हा ॥ ७-२५१ ॥ 

द्वैताच्या अभावी  
ययाचे पाहणे   
असे न पाहणे 
सांगितले  ॥ ५३८ ॥ 

आणिक तरीही   
घडते पाहणे   
सहज पणाने   
हेही खरे ॥५३९॥

येथें बोलणें न साहे । जाणणें न समाये । अनुभऊ न लाहे । अंग मिरौ ॥ ७-२५२ ॥ 

लाग न लागता  
बोलणे खुंटते   
जाणणे सरते  
जाणण्याने  ॥५४०॥ 

मग अनुभव   
जगी ज्यास मान 
जाई हरवून   
त्याचा तो ही   ॥ ५४१॥

म्हणोन ययातें येणें । ये परीचें पाहणें । पाहतां कांहीं कोणे । पाहिलें नाहीं ॥ ७-२५३ ॥ 

म्हणून जयाचे  
स्वतःला पाहणे  
नच की पाहणे 
कुणी काही ॥५४२॥

किंबहुना ऐसें । आत्मेनि आत्मा प्रकाशे । न चेतुचि चेऊं बैसे । जयासि तो ॥ ७-२५४ ॥ 

किंबहुना हे   
आत्माची प्रकाशे  
आत्म्यालागी असे   
जणू काही  ॥ ५४३॥

आत्माच चैतन्या 
 करता न जागा  
राहात असे जागा  
सदा स्वये.॥५४४॥

स्वयें दर्शनाचिया सवा । अवघियाची जात फावां । परी निजात्मभावा । न मोडिताही ॥ ७-२५५ ॥ 

दर्शन रूपे जो   
स्वतः विराजित   
होई गा भ्रमित 
द्रष्टा दृश्ये ॥ ५४५॥ 

निजात्म भाव तो  
तयाचा तरी ही 
मोडला कधीही  
जात नाही ॥५४६॥

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...