Wednesday 21 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या ११ते १५ (अभंग२२ ते ३३)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या ११ते १५ (अभंग२२ ते ३३) 
💮💮💮💮💮💮

ययापरौतें कांहीं । संविद्रहस्य नाहीं । आणि हें तया आधींही । असतचि असे ॥ १०-११ ॥ 

याहून काही ते
नाहीच आण रे 
रहस्य वेगळे 
जनात या ॥२२

प्रतिप्रदानाच्या 
आधीही ते होते 
नव्याने न  होते
सिद्ध काही ॥२३

तर्ही ग्रंथप्रस्तावो । न घडे हें म्हणों पावो । तर्ही सिद्धानुवाद लाहों । आवडी करूं ॥ १०-१२ ॥ 

तर मग कोणी 
इथे म्हणू पाहे 
ग्रंथ लिहणे हे 
कशासाठी ॥२४

घडला अथवा 
नच वा घडला 
आरंभ कशाला 
मांडला हा ॥२५

(तयासी उत्तर 
देती ज्ञानदेव 
मनी प्रेम भाव 
धरुनिया ॥२६)

होते जे का सिद्ध 
त्याचा अनुवाद 
आवडी भरात 
केला आहे ॥२७

पढियंतें सदा तेंचि । परी भोगीं नवी नवी रुची । म्हणोनि हा उचितुचि । अनुवाद सिद्ध ॥ १०-१३ ॥ 
आवडती वस्तू 
तिच ती असते
भोगतांना गोडी 
अवीट ची ॥२८

म्हणून या इथे 
उचित हे पाहे 
अनुवाद आहे 
केला सिद्ध ॥२९

या कारणें मियां । गौप्य दाविलें बोलूनियां । ऐसें नाहीं आपसया । प्रकाशुचि ॥ १०-१४ ॥ 

याच कारणे मी 
जरी मी बोललो
गौप्य न सांगतो
गोष्ट काहि ॥३०

आधीच रे गोष्ट
ही स्वयंप्रकाश 
दावणे प्रकाश 
नाही निज ॥३१

आणि पूर्णअहंता वेठलों । सैंघ आम्हीच दाटलों । मा लोपलों ना प्रगटलों । कोणा होऊनी । १०-१५ ॥ 
अहंता हरलो 
पूर्णता पावलो 
सर्वत्र दाटलो 
मीच जरी ॥३२

कोणाच्या अपेक्षे- 
मुळे न लोपलो
किंवा प्रकटलो
काही होत ॥३३

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

1 comment:

  1. सोप्या शब्दांमध्ये मांडला अर्थ . 🙏🙏

    ReplyDelete

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...