Sunday 29 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ३१ ते३५(अभंग५८ ते ६६ )




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ३१ ते३५(अभंग५८ ते    ) 
============================================================


म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।
नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥
 

३१
म्हणुनिया ते हे 
आहे नाही पण 
आत्मा पाहतो न
मुळीसुद्धा ५८

आहे नाही पणा 
अवघ्या सारून 
आहे पणी ज्ञान 
सामावले ५९

परी आणिका कां आपणया । न पुरे विषो हो‍आवया ।
म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥
 
ज्ञानाचा विषय 
परमात्मा नाही 
कळत कुणाही
कधीच तो ६०

मग तो न सदा
असे म्हणावया 
काय देख  तया 
वाव आहे ६१


जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठ‍उ तया ॥ ४-३३ ।
 ३३
अरण्यी निजला 
कोणी न पाहिला 
स्वतःची तयाला 
स्मृती नाही

परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।
हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥

परी तो ची मेला 
ऐसिया बोलाला 
अर्थ ची कसला 
नाही मुळी ६३


तैसे तया सुद्धा 
असणे हे आहे 
बोलणे न साहे 
आहे नाही ६४

 
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे ।
परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥ ३५
उलटून दृष्टी 
पाही स्वतःकडे 
दिठी पण मोडे
जैसे तिचे ६५

परि ती असते 
मुळात राहते 
नच की नष्टते 
शक्ती तिची ६६

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

Thursday 26 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २६ रे ३० (अभंग५१ ते५७ )




 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४  ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २६ रे ३० (अभंग५१  ते५७   )
 -----------------------------------------------------------------------------------------------------



तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
 

जरी काही नाही 
ऐसी ही अवस्था 
कळते सर्वथा 
कुणाला ते५१



शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ?
नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ ४-२७ ॥
  2७
जेणे होय बोध 
शून्य सिद्धांताचा 
कोणत्या सत्तेचा 
हात तिथे ५२

नसणे पणाचा 
आरोप वस्तूला 
पाहता कळला 
नीट पणे ५३


माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
 2८
मालवून दिवा 
मालविता मरे 
तरी कुणा कळे 
दीप  नाही ५४


कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
 2९

निद्रा भली होती 
कळेल कुणाला 
निद्रेतच गेला 
प्राण जर ५५


घटु घटपणें भासे । तद्‍भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥ ३०
घट पणे घट 
तुटता ही घट 
भासतसे घट 
पाहणाऱ्या ५६

आणि घट तोच 
सर्वथा ही नाही
ऐसा कोण पाही 
अभाव हा ५७
 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday 22 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २१ ते २५ (अभंग ४१ ते५० )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४   ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २१  ते  २५   (अभंग ४१ ते५० )
 -------------------------------------------------------------------------------------------------------------


सूर्य सूर्यासि विवळे ?। कां फळ आपणया फळे ?
परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥
 
२१
सूर्य प्रकाशित 
करे का सूर्याला   
फळा फळाला  
येत असे 

सुगंध सुगंध 
घेई उपभोग 
ऐसा विनियोग 
झाला आहे


तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।
म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥
२२
तसेच आपण 
न जाणे आपणा 
जाणण्याच्या खुणा 
सापडेना ४३

ज्ञातेपणा विन 
द्वैताला सांडून 
असते होऊन 
ज्ञान मात्र ४४


आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।
तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥
 २३
ज्ञानाला ज्ञानाने 
म्हणते जे ज्ञान 
काय ते अज्ञान 
नाही काय

अज्ञाना पर्यायी 
असे जे हे ज्ञान 
तयात अज्ञान 
अंतर्भूत ४६

जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।
मा तेज जही होये । तेजासी का‍ईं ? ॥ ४-२४ ॥
 
बघा तेज जैसे 
असे जे जे काही 
अंधारात ते नाही 
खरोखर


परी तया तेजा 
हेच तेज असे 
म्हणावे ते कसे 
सांगा बरे


तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।
आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥ २५
जर का असणे 
आणिक नसणे 
नाही जया होणे 
कधीकाळी

तर मग सारे 
नाही काय मिथ्या
अवघी ही वाया 
वार्ता कुणा ५०

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 https://amrutaanubhav.blogspot.com

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...