Thursday, 19 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या १६ रे २० (अभंग ३१ ते ४० )






अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४  ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या १६ रे २० (अभंग ३१ ते ४०  )
 **********************************************************************

कां तेजांतरें नाटोपे । कोण्हे तमें न सिंपे ।
तें उपमेचें जा‍उपें । सूर्यचि होय ॥ ४-१६ ॥
 
१६
इतर तेजाची 
जया न फिकीर 
नच की अंधार 
व्यापलेला   ३१

ऐसाची तो सूर्य 
स्वयंप्रकाश  
स्वयंभू व्यापक 
अनुपम३2



म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।
तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥ ४-१७ ॥
 १७
जाणत्या ज्ञानाने 
नच उमलते 
नच वा मळते
अज्ञानाने ३३

निर्मळ निरभ्र 
स्वयंभू केवळ 
व्यापून सकळ 
चराचर ३४


परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें ।
का‍ई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ ४-१८ ॥
 १८
केवळ निखळ
ऐसे हे ज्ञान 
स्वतःला जाणून 
असे काय ? ३५

डोळ्याचे बुबुळ 
आहे का स्वतःला 
अशा या प्रश्नाला 
उत्तर हे ३६
१९ 


आकाश आपणया रिगे ? । कायी आगि आपणया लागे ?
आपला माथा वोळघें । आपण कोण्ही ? ॥ ४-१९ ॥
 
आकाश  शिरते 
काय ते आकाशी
आग का आगीशी 
लागू शके ३७

आपण आपल्या 
चढतो का माथी 
अवघ्या या गोष्टी 
असंभव ३८
 20 


दिठी आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ?
नादु आपलें आ‍इकें ? । नादपण ॥ ४-२० ॥

काय दृष्टी पाहू 
शकते स्वतःला 
चाखतो  स्वतःला 
स्वाद काय ३९

काय कानी येते 
 नादी नाद पण 
भिन्न ते होऊन 
स्वतःहून ४०
 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...