Friday 24 July 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ६१ ते६८(अभंग ११८ते १३३)संपूर्ण


तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक । तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥ 

 
जैसा अनुभाव्य
नि अनुभविता
अनुभवी सदा 
असतात ॥११८

परी आत्मस्थिती 
अभाव ययाला 
संबंध तयाला 
मग कुठे॥११९


अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी । तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥ 

तैसा अनुभव 
जातसे जिरून  
ठाईच विरून 
आपुलिया ॥१२०

तर मग तेथे 
शब्दांनी वर्णन 
कैसे हे घडून 
सांगा बरे ॥१२१


कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी । मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥ 


अहो तिथे परा 
विलय पावते 
नादा न मिळते 
जागा काही ॥१२२

तर मग ओठी 
येईल बोलता 
काय रे हे घेता 
होत आहे ॥१२३

६४

चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी । कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥ 

जागे झाल्यावर 
जागे करण्याच्या
गोष्टी त्या कामाच्या 
नाही जशा ॥१२४

जेवून उठला 
समाधानी झाला 
का पुन्हा पाकाला 
लागे सांगा ॥१२५
६५

उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती । वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥ 

 उगवता दिन 
दिवे मालवती 
तयाला लावती 
कोण पुन्हा ॥१२६

पिकुनिया शेती 
धान्य आले हाती 
तया नांगरती 
काय कोणी॥१२७

६६

म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।आतां निरूपणाचें भोज । वोळगे जर्ही ॥ ५-६६ ॥ 

बंध मोक्षाचे ते
जरी नाही काम 
घडला विराम 
तया जरी ॥१२८

तरी निरूपण 
डे कौतुकाने
काही मिळवणे
नसे तया ॥१२९

६७
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें । मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥ 

कधी पुढीलांना 
वा आपल्याला 
विसर पडला 
स्वरूपाचा ॥१३०

शब्दचि तयाची
करी आठवण 
तेच प्रयोजन 
असे त्याचे ॥१३१
६८
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें । जर्ही  स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥ ॥ 
स्वरूपाची स्मृती 
करुनिया देती 
जगी मिरवती 
शब्द जरी ॥१३२

परी तेवढीच 
तयांची ती शक्ती 
मोठेपणा मिती 
आण नाही.॥१३३

इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥

पद्यानुवादक 
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...