Thursday 26 December 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ४१ ते ४५ पर्यन्त


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या  ४१ ते ४५  पर्यन्त


राति नुरेचि सूर्या । नातरी लवण पाणिया ।  
नुरेचि जेवी चेइलिया । नीद जैसी ॥ २-४१ ॥  


४१

सूर्य देव येता
रात्र जाते लया
लवण पाणिया
हरवते९४

जागे झाल्यावर
नुरेचि ती निद्रा
घडते सर्वदा
असे इथे९५

४२

कापुराचे थळीव । नुरेचि आगीची बरव ।  
नुरेचि रूप नांव । तैसें यया ॥ २-४२ ॥  

कापूर दागिने
बरवे साजरे
हारपती सारे
अग्नी माजि९६

नुरे नावरूप
ऐसे शिष्या घडे
भेदभाव मोडे
गुरू पुढे९७

४३

याच्या हातांपायां पडे । तरी वंद्यत्वें पुढें न मंडे ।  
न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥ २-४३ ॥  

जरी कधी यांच्या
पडे हातापाया
जातसे वंदाया
प्रेमभावे९८

तरी ते न घेती
भिडे न पडती
द्वैतां न येती
का ही केल्या९९

४४

आपणाप्रति रवी । उदो न करी जेवीं ।  
हावंद्य नव्हें तेवीं । वंदनासी ॥ २-४४ ॥  

काय रवी कधी
आपणाला साठी
येतो उदयाती
पुर्वांचली १००

तैसे वद्य जरी
सद्गुरु मूर्ती
वंदना प्रती
कुठल्याही१०१

 ४५
कां समोरपण आपलें । न लाहिजे कांहीं केलें ।  
तैसें वंद्यत्व घातलें । हारौनि येणें ॥ २-४५ ॥

आपण आपल्या
राहून समोर
भेटीची मोहर
उमटेना१०

तैसे ते वंद्यत्वी
नाहीच उरले
जगी सामावले
 साऱ्या रुपी१०३
...........
विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com

Friday 20 December 2019

अमृतानुभव, शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ६४ श्लोक 128 ओव्या .[ एकत्रित ]





यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययम

श्रीमन निवृतिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥1 ॥ 


असे जे अक्षर
वर्णना अतीत
आनंद प्रतीत
स्वयमेव॥1
जन्म न जयाला
प्राप्त न व्ययाला
शरण मी त्याला
जात असे ॥2

गुरूरित्याख्यया लोके साक्षद्विद्या हि शांकरी 
जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम ॥2॥ 

श्री निवृत्तीनाथ
नामी जे विख्यात
प्रत्यक्ष दैवत
असे माझे ॥3
गुरु नाम थोर
करुनी धारण
होय अवतीर्ण
जणू  काही॥4
अथवा विद्याच
साक्षात शांकरी
येतसे आकारी
जगतात ॥5
सदा आज्ञा रूपे
विजयी जगी या
नमन मी तया
करी तसे ॥6
दयाच जणू की
येत ओघळूनी
सदा तयातूनी
कृपाकर ॥7 

सार्ध केन च कस्यार्ध शिवयो:समरूपिणो 
ज्ञा तुं न शक्यते लग्न मिति द्वैतच्छलान्मुहू: ॥3॥ 

शिव आणि शक्ती
यात अर्धे कोण
पाहता शोधून
कळू  न ये ॥8॥ 
घेता द्वैत शोध
हाती येतो भास
असे एकेकास
जोडलेले ॥9॥ 

अद्वैत्ममात्म्नस्तत्व  दर्श्ययन्तौ मिथ्स्तराम 
तौ वंदे जगतामा द्यौ तयोस्त्तत्त्वाभिपत्तये ॥4॥ 


अद्वैत रूपात
आत्मतत्त्व होत
स्पष्ट से दावित
मिथकत्व ॥10
ऐसे विश्वाधार
त्याचे व्हावे ज्ञान
म्हणूनी वंदन
करितो मी ॥11



मुलायाग्राय मध्याय मुलमध्यायमूर्तये 
क्षीणाग्रमुलमध्याय नम: पूर्णाय शंभवे ॥5॥ 

असे जो कारण
जग आरंभास
स्थिती विलयास
पूर्णपणे ॥12
किंवा आपणच
आधी मध्य अंत
होऊन नांदत
स्वयं येथे ॥13
स्वरूपी जयाच्या
तिहींचा अभाव
तो श्री शांभव
नमिला मी॥14 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://anubhavamrut.blogspot.co.in
***********************************************************
रकरण पहिलें

ऐसीं इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवो देवी ॥१॥


ऐसी ही देखिली
म्या निरुपाधिक
जननीजनक
जगताची ॥
-
विश्व वृक्षाचे जी
जणू काही मूळ
वंदिली कृपाळ
देव देवी ॥

**
जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं ।
चारुस्थळीं एका हारीं । एकांगाचा ॥२॥
.
तया शिवाची जी
असे प्राणेश्वरी
तिये प्रेमभरी
वेडावून ॥
-
घेतसे जो उडी
तिच्या स्वरूपात
जाई हरपत
तिये ठायीं ॥
 -
ऐक्याची ही स्थिती
सर्वोच्च साजरी
एकाच शरीरी
नरनारी ॥
**
आवडीचेनि वेगें । येकयेकां गिळिती आंगें ।
कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥३॥
आवडी आवेगी
घालूनियां मिठी
एकरूप प्रीती
अनुभवे ॥
-
एकेकासी ती
जणू की गळती
गमे अशी स्थिती
तया ठायी ॥

किंवा रमण्यात
द्वैताच्या आनंदी
होवू ते पाहती
वेगळाले ॥
**
जे एकचि नव्हे एकसरें । मा दोघां दोनीपण कैचें पुरे ।
काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥४॥
-
पाहता एकची
नव्हे एकसरे
परि द्वैत  सरे
असे नाही ॥
-
जयांचे स्वरूप
पाहता साकार
लागेना तो पार
काही केल्या ॥

**
कैसी खसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं ।
नेदिती मा कौतुकीं । एकपण फुटों ॥५॥
-
कैसी स्वरूपाची
अतीव आवड
अद्वैत बिघाड
होत नाही ॥
-
आनंद विलासी
द्वैत अविर्भाव
परी एक भाव
जात नाही ॥
-
आनंद कल्लोळी
द्वैताचा आभास
तोही परि त्यास
बाध्य नाही ॥


 
 हा ठावोवेर्‍ही वियोगभेडें । जें बाळ तरि जगायेवढें ।
वियालीं परी न मोडे । दोघुलेंपण ॥६॥
जगाच्या एवढे
बालक होवून
जाईना मोडून
दोन पण ॥15॥

वियोग वैगुण्य
तयांच्या प्रेमीं न
कधीही घडून
येत असे ॥16॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ।
परि नेदितीच तिसरा । झोंक लागों ॥७॥
तया अंगी जरी
घडतो संसार
सारे चराचर
अंकुरते ॥17॥
तिसरे पणाची
तया ना झुळूक
असे हे कौतुक
दिसू येते ॥18॥
जयां एका सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।
जें आनादि एकपणें । नांदती दोघें ॥८॥
एकाच सत्तेचे
तयाला आसन
एकच ते लेण
प्रकाशाचे ॥19॥

ऐसी ही अनादी
एकत्र नांदती
दोन म्हणवती
जरी इथे ॥20॥
भेदु लाजोनि आवडीं । एकरसीं देत बुडी ।
तो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथ ॥९॥
दोघात शिरण्या
पाही भेद भाव
परि अटकाव
होतो तया  ॥21॥

मग तो लाजून
होय एकरूप
आपले स्वरूप
विलोपून ॥22॥

देवें संपूर्ण देवी । तियेविण कांहिंना त गोसावी ।
किंबहुना एकोपजीवी । एकमेकां ॥१०॥


देवाने पूर्णत्व
येतसे देवीला
अर्थ ना देवाला
देवीविना ॥23॥
अशी ही जोडी
पुरुष प्रकृती
एकमेका देती
पूर्णत्वची ॥24 ॥


कैसा मेळु आला गोडिये । जे दोघें न माती जगीं इये ।
कीं परमाणुहीमाजि उवायें । मांडलीं आहाती ॥११॥
ऐक्याची ही गोडी
वर्णा वी ती किती
दोघें न मावती
त्रिलोकीही ॥25॥
अणुरेणुलाही
राहती व्यापून
अवघे होऊन
आनंदात ॥26॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंहि निर्माण ।
जियें दोघें जीवप्राण । जियां दोघां ॥१२॥
एकमेकाविना
तृणही निर्माण
करू शकती न
असे एक ॥ 27॥
जणू एकमेका
देऊन जीवित्व
धरती अस्तित्व 
अनादी ही ॥28॥

घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे ।
तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ॥१३॥
घरात मोटकी
दोघेच असती
जगत व्याप्ती
सर्व काही ॥29॥
पुरुष निजता
स्वामींनी जागते
संसार पाळते
सामर्थ्यांने ॥30॥
जयां दोघांमाजि येखादें । विपायें उमजलें होय निदें ।
रितें घरवात गिळूनि नुसधें । कांहीं ना करी ॥१४॥
होय कुणी जागे
दोघांमध्ये यया
संसार विलया
जातो असे ॥31॥
गिळून जगत
स्वरूप मागुती
केवळ उरते
अन्य नाही ॥32॥

दोहों अंगाची आटणी । गिंवसित आहाती येकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाआधीं जियें ॥१५॥
दोघाही ययांची
होवून आटणी
स्वरूप मिळूनी
हरवती ॥33॥
तरीही भेदाच्या
जावून वाहिनी
अर्धाधी रूपांनी
मिरवती ॥34॥

विषो येकमेकांची जियें । जियें येकमेकांचीं विषयी इयें ।
जियें दोघीं सुखियें । जियें दोघें ॥१६॥

प्रकृती पुरूषा
होतसे विषय
पुरुषां विषय
प्रकृती ती ॥35॥
ऐसे परस्पर
देण्यात घेण्यात
जगती सुखात
दोघेजन ॥36॥


स्त्रीपुरूषनामभेदें । शिवपण येकलें नांदे ।
जग सकळ आधाधे । पणें जिहीं ॥१७॥
 स्त्री अन् पुरुष
दिसे नामभेदे
शिवतत्त्व नांदे
ऐकलेच .॥37॥

त्रलोक्य अवघे
व्यापले अधाधे
जे  काही भासते
दृष्टीस या ॥38॥


दो दांडीं येक श्रुति । दो फुलीं येक द्रुति ।
दोहो दिवीं दीप्ति । एकीच जेंवि ॥१८॥

दोन टिप-यांचा
एकच तो नाद
एकच तो गंध
दोन फुला ॥39॥

जरी लावियले
दिवे दो सामोरी
प्रभा घरीदारी
एक असे ॥40॥



 
दो ओंठीं येक गोठी । दो डोळां एकचि दिठी ।
तेविं दोघीं जिहीं सृष्टी । एकींच जेविं ॥१९॥

दोन जरी ओठ
एक असे गोष्ट
दोन्हीही  डोळ्यात
एक दृष्टी॥41 ॥
 
प्रकृती पुरुष
तैसे या जगात
ऐसे  नांदतात
एकपणी  ॥42 ॥


 
दाउनी दोनीपण । एक रसाचें आरोगण ।
करित आहे मेहुण । अनादि जें ॥२०॥

दावी दोनपण
परी रसपान
करी आरोगण
एकत्वाचे ॥43॥

प्रकृती पुरुष
अनादी  मेहूण
द्वैताचा दावून
आभास तो॥44॥

जे स्वामिचिया सत्ता । वीण असों नेणें पतिव्रता ।
जियेविण सर्व कर्ता । कांहींच ना जो ॥२१॥
पतीव्रते तिये
सदा स्वामीसत्ता
जाईना अन्यथा
कुठेही ती ॥४४ ॥
णिक स्वामीला
तियेविन नाही
कर्तृत्व ते काही
इये जगी ॥४५ ॥
जे कीं भर्ताराचें दिसणें । भर्तार जियेचें असणें ।
नेणिजती दोघें जणें । निवडूं जियें ॥२२॥
शक्तीचे अस्तित्व
असे शिवावर
तिजला आधार
सर्वथा तो ॥ ४६॥
प्रकृती पुरुष
एक एकाधीन
करणे विभिन्न
शक्य नाही ॥४७ ॥
गोडी आणि गुळु । कापूर आणि परिमळु ।
निवडू जातां पांगूळु । निवाड होये ॥२३॥
गुळआणि गोडी
कापूर सुगंधा
वेगळे करता
येत नाही ॥४८ ॥
निवडणे तिथे
होते पूर्ण व्यर्थ
असे एकवट
दोघे जण ॥४९ ॥
समग्र दीप्ती घेतां । जेविं दीपचि ये हाता ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवचि लाभे ॥२४॥
दीप्ती घेऊ जाता
दीप येतो हाता
ऐसी समग्रता
येथे असे ॥५० ॥
तैसे येथे शक्ती
शोधता तत्त्वता
शिव येई हाता
सवे तिच्या ॥५१ ॥
जैसा सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यचि गाभा ।
तेविं भेद गिळीत शोभा । एकीच जे ॥२५॥
सूर्य मिरवतो
प्रकाशाची आभा
प्रकाशात गाभा
सूर्याचाच ॥५२ ॥
सूर्य प्रकाशात
भेद नाही जैसा
शिवशक्ती तैसा
न्याय असे ॥ ५३॥

कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे ॥२६॥
 
प्रतिबिंब असे
बिंबास कारक
बिंबास द्योतक
    प्रतिबिंब ॥ ५४॥
प्रकृती पुरुषी
तैसे द्वैत मिषे
दोन भासतसे
         एक चि जे ॥ ५५॥
र्व शून्याचा निष्कर्षु । तो जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्ताविशेषु । शक्ति जाली ॥२७॥
 
सर्वही शून्याचा
असे जो निष्कर्षू
परम परेशू
सत्ताधीश ॥ ५६॥
जियेने घेतला
करून दादला
मिळाली तियेला
त्याची शक्ती ॥ ५७॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींही शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें घडिली ॥२८॥
 
असे प्राणेश्वरी
शिवा जियेविन
नसे शिवपण
असे होय ॥ ५८॥
म्हणून जणू की
शिवे घडविली
धारण हि केली
अंगामध्ये ॥ ५९॥
ऐश्वर्यैसीं ईश्वरा । जियेचें आंग संसारा ।
आपलाही उभारा । आपणचि जे ॥२९॥
 
ईश्वरा ऐश्वर्य
दिधले  तियेन
संसारा देऊन
आकार या ॥ ६१॥
आपुलिये अंगा
रचिला पसारा
घेऊन उभारा
स्वयं येथे॥ ६२॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥३०॥
अरूप आपुल्या
पतीला पाहून
गेली ती लाजून
सहजीच॥ ६३॥
म्हणूनया मग
केले मिरवणे
विश्वाचे हे लेणे
अंगावरी॥ ६४॥
******
जेथें ऐक्याचा दुकाळा । तेथें बहुपणाचा सोहळा ।
जियें सदैवेंचिया लीळा । दाखविला ॥३१

एकलेपणाच्या
सारून दुष्काळा
अनंत सोहळा
मिरविला ॥65 ॥
सुदैवपणाच्या
दाऊनिया लीला
आणीले रूपाला
जगता या  ॥66 ॥

आंगाचिया आटणीया । कांत उवाया आणिया जिया ।

स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥३२॥

कष्टवून अंगा
शक्तीने शिवाला
बळाचा दिधला
आधार  की.॥67 ॥
मग त्या शिवाने
स्वयें संकोचून
प्रिये मोठेपण
जगी दिले ॥68 ॥

जियेंते पहावयाचिया लोभा । चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा ।

जियेतें देखत उभा । आंगचि सांडी ॥३३॥
 

तिला पाहण्याचा
लोभधरी मना
दृष्टत्वाची धारणा
धरे तोही॥69 ॥
असे अंगभूत
सदा ती तयात
म्हणूनी दिसत
नाही कधी॥70 ॥

कांतेचिया भिडा । आवरला होय जगायेवढा ।

आंगवला उघडा । जियेवीण ॥३४॥

कांतेच्या भिडे
पती जग होय
नटूनिया जाय
विविधसा॥71 ॥
परि तिये विन
अंगा हरवून
उपाधी हरून
नाही होय॥72 ॥

जो हा ठाववेर्‍ही मंदरूपें । उवायिलेपणें हारपे ।

तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥

नसता ते दृश्य
दृष्ठत्व विरत
जाई हरवत
पुन्हा शुन्यी ॥73 ॥

असा हा जो सूक्ष्म
विस्तारे हरपे
होय विश्व रुपे
जियेमुळे ॥74 ॥

जिया चेवविला शिउ । वेद्याचे वोदनें बहु ।
वाढितोनिशिं जेऊं । धाला जो ॥३६॥
तिने शिवाला 
जागृत करून 
दिधले भोजन 
वेद्य असे 75
धाला मग तो ही 
करून भक्षण 
ती वाढणारीन
भोजा सवे 76
निदेलेनि भ्रतारें । जे विये चराचरें ।
जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥३७॥
निजता भ्रतार 
विये चराचर 
असा व्यवहार 
जिचा जगी 77
विसावता पण 
तिचे कर्तेपण
नवरे पण 
नुरे काही 78
 
जंव कांत लपों बैसे । तंव नेणवे जियेच्या उद्दिशें ।
जियें दोघें आरसे । जियां दोघां ॥३८॥
प्रकृती दोषे न
पुरुष कळो ये 
कुण्याही उपाये 
आच्छादिला ॥79 ॥
परी पाहता ते 
आरसेच दोन 
राही प्रकाशून 
एकमेका ॥80 ॥
जियेचनि आंगलगें । आनंद आपणापें आरोगूं लागे ।
सर्वभोक्ता परी नेघे । जियेविण कांहीं ॥३९॥
आणि तो पुरुष 
तिये अंगे संगे 
आनंदाची भोगे 
आपुलाची81
अन् तिच्या वीन 
भोक्तृत्व ही काही 
कदापि न घेई 
कधी काळी   ॥82 ॥
 
जया प्रियाचें जें आंग । जो प्रिय जियेचें चांग ।
काल‍उनी दोन्ही भाग । जिवितें आहाति ॥४०॥
पुरुषा प्रकृती 
गमे स्वयें अंग 
तिलाही ते चांग 
त्याचे बल ॥83 ॥
कालवून दोघे 
असे एका भागी 
जेवणाचे भोगी 
जणू सुख  ॥84 ॥

ओवी क्रमांक 41 ते 45 
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति ।
तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
वायू सवे  गती
सोन्यासवे  कांती
 शिवास ती शक्ती
तैसी असे 85
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।
तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
अग्नीत तो ताप
कस्तुरीस गंध
शिवशक्ती संघ
 तैसा असे 86
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो ।
तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही जियें ॥ १-४३ ॥
 
रात्र अन् दिस
गेली सूर्या पाहो
आपुला तो ठावो
हरवली 87
तैसी परब्रह्मी
शिव आणि शक्ती
हरवून जाती
पूर्णपणे 88
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें ।
दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४ ॥
जगत उत्पन्न
प्रवणा मधून
विस्तार येथुन
सृष्टीचा या 89
तयाला गिळती
शिव अन् शक्ती
वैरी ही असती
सकळाची 90
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळीत येकार्थाचा उजिरा ।
नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु म्हणे ॥ १-४५ ॥
असो, नामरूपाचा
असे भेद शिरा
भक्षुनि तो सारा
उरे तत्त्व 91
त्यास जी दाविती
शिवशक्ती दंपती
वंदे तया प्रति
ज्ञानदेव 92

जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।
आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ १-४६ ॥ 
तया दोघांच्या या
दृढ अलिंगन
दोघेही विरून
नाही होती 93
जैसी की रजनी
विलया  जावूनी
स्वरूपी राहूनी
अंतर्दृष्टी 94
 जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।
सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी ॥ १-४७ ॥
 
चारीही त्या वाचा
जयाच्या रूपात
जाती हरपत
निर्धारता 95
सिंधू सवे गंगा प्
रलयार्णावात
जाय हरवत
तैसा रीती 96

वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं ।
आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ १-४८ ॥

 
वायूच्या लहरी
वायूच्या सवेत
आकाश कुशीत
हरवती 97
अन् प्रभाकर
प्रलय तेजात
प्रभेचा सेवेत
आटू जातो 98

तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें ।
पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं तियें ॥ १-४९ ॥

 
तैसे न्याहाळीता
यया एक घेता
पाहणे पाहता
हरवतो 99
ऐसे अंतर्बाह्य
असती जे व्याप्त
नमु तया प्रत
पूर्णपणे   100
 
जयांच्या वाहाणी । वेदकु वेद्याचें पाणी ।
न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥ १-५० ॥ 

तया जाणण्या
जाणता जाणणे
होऊनिया उणे
लया जाई 101
प्राप्तर्थाचे पाणी 
प्याल्याविन कोणी
अंगाची सांडणी
जेवी करी 102


तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।

-ही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥



आणिक येथे मी 

करू नमस्कारा 

म्हणता दुसरा 

होऊ जाय 103


एकत्व सांडून 

प्रमाद करून

कैसी ये घडून 

वंदना ती 104



परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।

हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥


सोन्याहून जैसे 

लेणे नव्हे भिन्न 

तैसे हे नमन 

माझे येथे 105



सांगतां वाचेतें वाचा । ठा‍उ वाच्य वाचकाचा ।
पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥


वाणीने उच्चार 

वाणी या शब्दांचा 

दिसतो भेदाचा 

विटाळची 106


शब्दात हि वाणी 

वाणीतही  वाणी

भेदाची कहाणी 

नाही तिथे 107



सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।
दिसतसे तरी काय पाणी । द्वैत हो‍ईल ? ॥ १-५४ ॥


सिंधूनी गंगेचा 

संगम हा झाला 

पाणीच पाण्याला 

मिळाले ते 108


गंगा सिंधू नाम

स्त्री पुरुष वाचक 

पाण्याला बांधक

होतं नाही 109



पाहे पां भास्य भासकता । आपुला ठा‍ईं दावितां ।
एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥



सूर्याच्या प्रकाशी 

सूर्याचे दर्शन 

दिसे द्वैतपण 

उजेडाचे 110


भास भासकता 

ययाची एकता 

पाहता तत्त्वता 

कळू येते 111
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।
का‍ई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥


चंद्र बिंबावर
चंद्राचा प्रकाश
भेदाचा आभास 
तिथे नसे  112
दीपा विना दीप्ती 
घेण्यास जी जाती 
येई तया हाती 
दीपाची तो 113
मोतियाची किळ । होय मोतियावरी पांगुळ ।
आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
 
मोतीयाचे तेज 
मोतीयाचे रंगी
मोतीपणा अंगी 
शोभतसे 114
 मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु का‍इ केला चिरटिया ?
कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला का‍ई ? ॥ १-५८ ॥

ओंकारी मात्रेचा 
असते त्रिपुटी 
त्यास का म्हणती 
तुकडे ते 115
कार शब्दाला 
तीन रेषा थेट 
म्हणून का भेद
होतो काय 116
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥


एकत्वाला धक्का 
नच की लागता 
लाभे सुंदरता  
का न घ्यावी 117
पाण्यावरी फुल 
तरंगाची व्हावी 
का न ती हुंगावी 
पाणीयानी 118
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।
मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
म्हणून भुतेश 
आणिक भवानी 
एकच मानूनी 
पाहियली 119
तयात न भेद 
एक पणी एक 
अभिन्न मी होत 
जाणयली 120
 

दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।

कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥


बिंब प्रतिबिंबि

राहते येऊन  

त्यागिता दर्पण 

आपोआप 121


थांबताच वायु 

लहरी नर्तन

होतात विलीन 

पाणीयात 122


नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।

तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥

सरताच नीद

आपुलाच ठाव 

कळू येई भाव 

आपुल्यात 123


तैसा बुद्धी त्याग्ये

उपाधी सरता   

जहालो वंदिता  

देवी देव 124


सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।

तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥


सांडूनिया मीठ 

पणाचा तो लोभ 

घेतला हा लाभ

सिद्धत्वाचा 125


असे इथे केले

अहं म्या त्यागिले 

स्वरूप पातले

शिव शक्ती 126



शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।

रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥


शिवशक्ती मध्ये 

पूर्ण  सामावलो

एकरूप झालो

नमोनिया 127


केळी रोपट्याने 

सर्वस्व त्यागिले 

आकाश ते झाले 

रिघोनिया 128

******


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...