अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या ३१ ते ३५ पर्यन्त
**************************************************
तेथें नमनें का बोलें। केउतीं सुयें पाउलें ।
आंगीं लाउनि नाडिलें । नांवचि येणें ॥ २-३१ ॥
केवुते वंदावे
तया ते शब्दांनी
अथवा नमुनी
आदरेनी .॥७२॥
लावूनी निवृत्ती
नाव हे ज्यांनी
नाडले सारुनी (दुर ठेवले अडविले )
शब्द स्पर्श ॥७३॥
32
नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ति । वाढवितां कें निवृत्ति ? ।
तरी या नामाचि वायबुंथी । सांडीचिना ॥ २-३२ ॥
आत्माचे ठिकणी
न आत्मप्रवृती
मग हे निवृति
नाव कैसे ..॥७४॥
म्हणूनी गमते
वस्त्राचा आभास
निवृति नावास
जणू काही ॥७५॥
निवर्त्य तंव नाहीं । मा निवर्तवी हा काई ? ।
तरि कैसा बैसे ठाईं । निवृत्ति-नामाच्या ? ॥ २-३३ ॥
नसे निवारण्यात
येथे दिसे काही
मग ही आवई
कुठे कैसी ॥७६॥
निवृत्ती नाव हे
कैसे तया ठायी
काहीच्या बाही
असे काय ?॥७७॥
३३
सूर्यासि अंधकारु । कैं झाला होता गोचरु ? ।
तर्ही तमारि हा डगरु । आलाचि कीं ॥ २-३४ ॥
काय पाहिलेले
रवीने अंधारा
भेटी एकएरा
घडे कधी ॥७८॥
तरीही तमारी
सूर्याचीही कीर्ती
गाजते जागती
सर्वकाळ ॥७९॥
३४
लटिकें येणें रूढे । जड येणें उजिवडे ।
न घडे तेंहि घडे । याचिया मावा ॥ २-३५ ॥
जयाचे सामर्थ्य
खोटे खरे होते (स्पष्ट होते )
जड प्रकाशाते
सहजीची ॥८०॥
जयाचिया नावे
घडे जे जे काही
नच घडे तेही
ये आकारा ॥८१॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment