Sunday 27 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ७१ते ७५, (अभंग १५८ते१६७ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ७१ते ७५, (अभंग १५८ते१६७ )   


 तैसें अज्ञान आपुली वेळ  भोगी हेचि टवाळ  आतां तरी केवळ  वस्तु होऊनि नसे  -७१  देखा वांझ कैसी विये ?  विरूढती भाजली बियें ?  कीं सूर्य कोण्हा लाहे  अंधारातें ?  -७२  तैसा चिन्मात्रे चोखडा  भलतैसा अज्ञानाचा झाडा  घेतला तरी पवाडा  येईल काई ?  -७३  जे सायेचिये चाडे  डहुळिजे दुधाचें भांडें। ते दिसे कीं विघडे  तैसें हें पां  -७४  नाना नीद धरावया हातीं  चेउनी उठिला झडती  ते लाभे कीं थिती  नासिली होय  -७५  

या परी सारे 

अज्ञान असणे 

आत्मत्वी वसने 

व्यर्थ होय ॥१५८

वस्तूची केवळ 

निखळ असते 

अन्य ते नसते 

काही तिथे ॥१५९

वंध्या नारीची ती 

होय का प्रसूती 

बीज विरुढती

भाजलेली ॥१६०

सूर्य काय कधी 

भेटण्या तमाला 

आहे काय गेला 

सांगा बरे ॥१६१

चिन्मय चोखळ 

आत्मा हा निखळ 

अज्ञान विटाळ 

तेथ नाही ॥१६२

आणि घेऊ जाता 

शोध तो निक्षून 

काही आल्यावीन 

हात रिते ॥१६३

सायीच्या हव्यासे 

ढवळले भांडे 

काय ती सापडे 

तिये माझी ॥१६४

घडे ती न घडे 

तो ची ना विघडे 

बोलणे हे घडे 

तैसेची रे ॥१६५

निद्रा पकडणे 

कुणी ठरवावे 

आणिक उठावे 

येताची ती ॥१६६

काय ती गावते

किंवा न गावते 

सांगावे लागते

काय कुणा.॥१६७

+++++

भावानुवाद

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


Friday 25 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६६ ते ७०, (अभंग १४८ते१५७ )

 



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ६६ ते ७०, (अभंग १४८ते१५७ )   

************


ऐसाहि आत्मा जेव्हां जैं नातळे भावाभावा अज्ञान असे तेव्हां तरी तें ऐसें -६६  

जैसें घटाचें नाहींपण फुटोनि होय शतचूर्ण कीं सर्वांपरी मरण मालवलें कीं -६७  

नाना निदे नीद आली कीं मूर्छां मूर्छें गेली कीं आंधारी पडली अंधकूपीं -६८  

काअभाव अवघडला का केळीचा गाभा मोडला चोखळा आसुडला आकाशाचा -६९  

कां निवटलिया सूदलें विख मुकियाचें बांधलें मुख नाना नुठितां लेख पुसिलें जैसें -७०  

भावानुवाद :-

========

६६

असणे नसणे 

याच्या निरपेक्ष 

आत्मा जो प्रत्यक्ष 

असे स्वयम् ॥१४८


तरी तया ठाई 

अज्ञान आरोप 

करता ते रूप 

ऐसे दिसे ॥१४९॥

६७

नसलेला घट 

जर का फुटला 

शतचुर्ण झाला 

कधी इथे ॥१५०


किंवा जर कधी 

मरणा मरण 

ठाकले येऊन 

सामोरीच ॥१५१

६८

अथवा निद्रेला 

जर निद्रा आली  

मुर्छनेस आली  

मुर्छा कधी ॥१५२


अंधार अंधारी 

जर का अडला 

आणिक पडला 

अंधकुपी  ॥१५३

६९

अभाव अडला 

संकटी पडला 

गाभाची मोडला 

केळीयेचा ॥१५४


निर्मळ नितळ 

आकाश पोकळ 

तयात तो मळ

असेच ना॥१५५॥

७०

मेलेल्या च्या मुखी 

विषची घातले 

मुक्याचे बांधले 

तोंड कुणी ॥१५६॥

जे नच अजून  

लिहियेले कुणी 

लेख ते पुसूनी

टाकीयले॥१५७॥

*****

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे


Monday 21 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६१ ते ६५ , (अभंग १३८ते१४७ )

  

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ६१ ते ६५, (अभंग १३८ते१४७ )   

************

 

*+*+*+
काइ दीप जैं लाविजे तैंचि काजळी फेडिजे कां नुगवत्या वाळिजे रुखाची छाया ६१  

नाना नुठितां देहदशा कालऊनि लाविजे चिकसा घडितां आरिसा उटिजे काई ६२  

कां वोहाच्या दुधीं सायचि असावी आधीं मग ते फेडूं इये बुद्धी पवाडु कीजे -६३  

तैसें आत्मयाच्या ठाई जैं आत्मपणा ठवो नाहीं तैं अज्ञान कांहीं सारिखें कैसें -६४  

म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे हें जालेंचि आहे आपैसें आतां रिकामेंचि काइसें नाहीं म्हणो -६५

*****

लावल्यावाचून 

दीपाची काजळी 

कुणी फेडू जाई 

तैसेचि हे॥  १३८॥

किंवा नुगवल्या

वृक्षाच्या छायेला 

सोडून जायला 

होते काय ॥१३९

६२

जन्मा जो नआला 

तया त्या देहाला  

उटी लावायला 

येई काय ॥१४०॥

नच घडविल्या 

आरश्या आणणे

निर्मळ करणे

साफ कैसे ॥१४१॥

६३

कासेतील दूध 

काढण्याआधी 

सायीची ती सिद्धी 

असे काय ॥१४२॥

तिला काढायला 

बुद्धी चालवणे 

म्हणजे करणे 

काय असे ॥१४३॥

६५

जर आत्म्या ठाई 

आत्मा हे संबोधन 

न ये चि घडून 

कधीकाळी ॥१४४॥

तर मग कैसे 

अज्ञान राहणे 

दृश्यादृश्य पणे 

सांगा बरे ॥१४५॥

६५

म्हणून या इथे 

अज्ञान हे नसे  

स्वयं स्पष्ट असे 

पाहू जाता ॥१४६॥

तर मग पुन्हा 

अज्ञान ते नाही 

बोलण्यात काही 

अर्थ असे ?॥१४७॥

******

भावानुवाद.

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोणे

Sunday 20 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ५६ ते ६० , (अभंग १२४ते१३७ )

 


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ५६ ते ६० , (अभंग १२४ते१३७ )   
**********
ना स्वकार्यातें विये जें कारणपणा नये  
मी अज्ञान ऐसें बिहे मानूं साचें -५६  
आत्मया स्वप्न दाऊं शके कीर बहू  
परि ठायें ठाउ निदेजउं नेणें -५७  
हें असो जिये वेळे आत्मपणेंचि निखळें  
आत्मा अज्ञानमेळें असे तेणें -५८  
जैसें करितां मंथन काष्ठीं अवस्थान  
जैसें कां हुताशन सामर्थ्यांचें -५९  
तैसें आत्मा ऐसें नांव साहे आत्मयाची बरव  
तैं कांहीं अज्ञान हांव बांधतें कां ? -६०



जो न उपजवे 
स्वतःच्या कार्याला 
कारण तयाला
कैसे ठरे ॥१२४

अज्ञान मी आहे 
सांगावया बिहे
अज्ञान ते का हे 
म्हणावे  रे ॥१२५

(अज्ञान मी आहे 
ऐसे हे बोलणे 
ज्ञानचि कथिने 
नाही काय ॥)१२६
५७
आत्म्याला अज्ञान 
दावीते न स्वप्न 
निश्चित ही जाण
पाहू जाता   ॥१२७

अखंड जागृत 
असे आत्मतत्त्व 
प्रत्यक्ष सतत 
विद्यमान ॥१२८

आणि जर का हे 
अज्ञान मानले 
गृहीत धरले 
मना माझी ॥१२९

तरी तेही कधी 
आत्मा पांघरून 
का न निजवून 
ठेवू शके॥१३०

५८
असो हे जे कोणी 
जर का म्हणते 
अज्ञान असते 
आत्म्या ठाई ॥१३१

जेव्हा आत्मपणे 
आत्माची असतो 
निखळ राहतो 
स्वरूपात॥१३२

५९
जैसा लाकडात 
अग्नीचे ते स्थान 
होण्याच्या मंथन 
अगोदर ॥१३३

घडता घर्षण 
येतसे बाहेर 
सामर्थ्य अपार 
असुनिया ॥१३४

 (पाहू जाता सोय
यया दृष्टांताती
व्यक्त दुसरी ती
गोष्ट होय)॥१३५
६०
अहो आत्मा नाव 
जया न सहावे 
तयास बरवे
काय वाटे ॥१३६

म्हणुनी अज्ञान 
आत्म्याठायी वसे 
अशक्यची असे 
सर्वथा हे ॥१३७
**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने  

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...