Sunday 20 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ५६ ते ६० , (अभंग १२४ते१३७ )

 


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ५६ ते ६० , (अभंग १२४ते१३७ )   
**********
ना स्वकार्यातें विये जें कारणपणा नये  
मी अज्ञान ऐसें बिहे मानूं साचें -५६  
आत्मया स्वप्न दाऊं शके कीर बहू  
परि ठायें ठाउ निदेजउं नेणें -५७  
हें असो जिये वेळे आत्मपणेंचि निखळें  
आत्मा अज्ञानमेळें असे तेणें -५८  
जैसें करितां मंथन काष्ठीं अवस्थान  
जैसें कां हुताशन सामर्थ्यांचें -५९  
तैसें आत्मा ऐसें नांव साहे आत्मयाची बरव  
तैं कांहीं अज्ञान हांव बांधतें कां ? -६०



जो न उपजवे 
स्वतःच्या कार्याला 
कारण तयाला
कैसे ठरे ॥१२४

अज्ञान मी आहे 
सांगावया बिहे
अज्ञान ते का हे 
म्हणावे  रे ॥१२५

(अज्ञान मी आहे 
ऐसे हे बोलणे 
ज्ञानचि कथिने 
नाही काय ॥)१२६
५७
आत्म्याला अज्ञान 
दावीते न स्वप्न 
निश्चित ही जाण
पाहू जाता   ॥१२७

अखंड जागृत 
असे आत्मतत्त्व 
प्रत्यक्ष सतत 
विद्यमान ॥१२८

आणि जर का हे 
अज्ञान मानले 
गृहीत धरले 
मना माझी ॥१२९

तरी तेही कधी 
आत्मा पांघरून 
का न निजवून 
ठेवू शके॥१३०

५८
असो हे जे कोणी 
जर का म्हणते 
अज्ञान असते 
आत्म्या ठाई ॥१३१

जेव्हा आत्मपणे 
आत्माची असतो 
निखळ राहतो 
स्वरूपात॥१३२

५९
जैसा लाकडात 
अग्नीचे ते स्थान 
होण्याच्या मंथन 
अगोदर ॥१३३

घडता घर्षण 
येतसे बाहेर 
सामर्थ्य अपार 
असुनिया ॥१३४

 (पाहू जाता सोय
यया दृष्टांताती
व्यक्त दुसरी ती
गोष्ट होय)॥१३५
६०
अहो आत्मा नाव 
जया न सहावे 
तयास बरवे
काय वाटे ॥१३६

म्हणुनी अज्ञान 
आत्म्याठायी वसे 
अशक्यची असे 
सर्वथा हे ॥१३७
**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने  

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...