Monday 21 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ६१ ते ६५ , (अभंग १३८ते१४७ )

  

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ६१ ते ६५, (अभंग १३८ते१४७ )   

************

 

*+*+*+
काइ दीप जैं लाविजे तैंचि काजळी फेडिजे कां नुगवत्या वाळिजे रुखाची छाया ६१  

नाना नुठितां देहदशा कालऊनि लाविजे चिकसा घडितां आरिसा उटिजे काई ६२  

कां वोहाच्या दुधीं सायचि असावी आधीं मग ते फेडूं इये बुद्धी पवाडु कीजे -६३  

तैसें आत्मयाच्या ठाई जैं आत्मपणा ठवो नाहीं तैं अज्ञान कांहीं सारिखें कैसें -६४  

म्हणोनि तेव्हांही अज्ञान नसे हें जालेंचि आहे आपैसें आतां रिकामेंचि काइसें नाहीं म्हणो -६५

*****

लावल्यावाचून 

दीपाची काजळी 

कुणी फेडू जाई 

तैसेचि हे॥  १३८॥

किंवा नुगवल्या

वृक्षाच्या छायेला 

सोडून जायला 

होते काय ॥१३९

६२

जन्मा जो नआला 

तया त्या देहाला  

उटी लावायला 

येई काय ॥१४०॥

नच घडविल्या 

आरश्या आणणे

निर्मळ करणे

साफ कैसे ॥१४१॥

६३

कासेतील दूध 

काढण्याआधी 

सायीची ती सिद्धी 

असे काय ॥१४२॥

तिला काढायला 

बुद्धी चालवणे 

म्हणजे करणे 

काय असे ॥१४३॥

६५

जर आत्म्या ठाई 

आत्मा हे संबोधन 

न ये चि घडून 

कधीकाळी ॥१४४॥

तर मग कैसे 

अज्ञान राहणे 

दृश्यादृश्य पणे 

सांगा बरे ॥१४५॥

६५

म्हणून या इथे 

अज्ञान हे नसे  

स्वयं स्पष्ट असे 

पाहू जाता ॥१४६॥

तर मग पुन्हा 

अज्ञान ते नाही 

बोलण्यात काही 

अर्थ असे ?॥१४७॥

******

भावानुवाद.

डॉ विक्रांत प्रभाकर  तिकोणे

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...