Wednesday 27 November 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २,सद्गुरू स्तवन,ओवी क्रमांक६ ते १०

 अमृतानुभव,  पद्य भावानुवाद, अध्याय २,सद्गुरू स्तवन,ओवी क्रमांक६ ते १०


सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।  
आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥


गुरूंचे सामर्थ्य
असे ऐसे थोर
जयाच्या समोर
शिव सान॥ १३ ॥

‍आरसा होऊन
आत्मसुख देतो
जीवा घडवतो
ऐसा  लाभ ॥ १४ ॥

बोधचंद्रचिया कळा । विखुरलिया येकवळा ।  
कृपापुनीवलीळा । करी जयाची ॥ २-७ ॥ 
 
 बोध रुपी चंद्र
अनेक कलांनी
राही विखरून
अनेकांगी ॥ १५ ॥

सद्गुरू कृपा
होऊन पूनम
लीलेचे  लाघव
दावीतसे ॥ १६ ॥

{ त्या तया काळी
पावे पूर्णावस्था
ब्रह्म तद्रुपता
शिष्य येथे }॥ १७ ॥

जो भेटलियाचि सवे । पुरति उपायांचे धांवे । 
 प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ २-८ ॥
 
सरे धावाधाव
येथे तिथे जाणे
भेटताच पेणे
मुक्कामाचे॥ १८ ॥

शोधाचा तो अंत
होऊन अखंड
नांदतो आनंद
त्यामध्ये॥ १९ ॥

जैसी गंगा धावे
सागरा समावे
तिथेच स्थिरावे
मग शांत॥ २० ॥

जयाचेनि अनवसरें । दृष्टाले दृश्याचें मोहिरें ।  
जो भेटतखेंव सरे । बहुरुपचि हें ॥ २-९ ॥
 
भेटता न गुरू
द्रष्टा दृष्यातला
होई जगातला
अंश एक॥ २१ ॥

परी कधी कुठे
सुकृत फळली
भेट जी जाहाली
तया सवे॥ २२ ॥

हरवते जग
पाहण्या सकट
द्रष्टयाचाही अंत
होत असे॥ २३ ॥

अविद्येचें काळवखें । कीं स्वबोध सुदिनें फांके ।  
सीतलें प्रसादार्कें । जयाचेंनि ॥ २-१० ॥

अविद्या काळोख
जाय हरवून
स्वबोध सु दिन
उजेडून॥ २४ ॥

शीतल प्रकाश
प्रसाद जयाचा
हरवे जगाचा
तापत्रय ॥ २५॥



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

Monday 18 November 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या १ ते ५



सद्गुरू स्तवन १ ते ५ ओव्या



आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।  
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥  


 साधन वनात
जणू की वसंत
येई बहरत
शिष्यासाठी

आज्ञेचा तो स्वामी
सौभाग्य होवूनी
येतसे जीवनी
बांधी गाठ

कारुण्याच्या भरी
अमूर्त ते रूप
होय मूर्तरूप
जगतात

अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।  
तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो कीं ॥ २-२ ॥  

अविद्या काननी
भोगे जीवपण
भवरी गुंतून
भ्रमाच्या जो

तया चैतन्याचा
ऐकोनिया धावा
येई तया गावा
कारुण्याने 

मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरु ।  
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २-३ ॥  

मायारूपी हत्ती
मदाने उन्मत्त
तयाचे फोडत
गंडस्थळ

तयातून काढी
मुक्तीचे ते मोती
सोहम हंसा देती
आवडीने 

ऐसा कृपावंत
भरविता गुरू
निवृत्ती दातारू
वंदीयला 

जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते ।  
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ २-४ ॥ 

जया दृष्टी भेदे
बंध होय मोक्ष
अशी असे साक्ष
ज्ञानीयाची 

जाता जयापासी
भेटते  जाणणे
जाणताच जीणे
कळो येई   १०

 कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।  
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥

चैतन्य कनक
जगी वाटतांना
म्हणती न साना
थोर कुणी   ११

जयाच्या कृपेने
द्रष्टा स्वरूपात  
जाय हरवत
आत्म प्रिय   १२


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com
 **********************************


Sunday 10 November 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय १, शिव शक्ति समावेशन ओवी क्रमांक ६१ ते ६४ संपुर्ण


अमृतानुभव अभ्यास






दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।

कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१॥



बिंब प्रतिबिंबि

राहते येऊन  

त्यागिता दर्पण 

आपोआप 121



थांबताच वायु 

लहरी नर्तन

होतात विलीन 

पाणीयात 122



नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।

तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥


सरताच नीद

आपुलाच ठाव 

कळू येई भाव 

आपुल्यात 123



तैसा बुद्धी त्याग्ये

उपाधी सरता   

जहालो वंदिता  

देवी देव 124



सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।

तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥



सांडूनिया मीठ 

पणाचा तो लोभ 

घेतला हा लाभ

सिद्धत्वाचा 125



असे इथे केले

अहं म्या त्यागिले 

स्वरूप पातले

शिव शक्ती 126





शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।

रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥



शिवशक्ती मध्ये 

पूर्ण  सामावलो

एकरूप झालो

नमोनिया 127



केळी रोपट्याने 

सर्वस्व त्यागिले 

आकाश ते झाले 

रिघोनिया 128


******


॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥



अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय १, शिव शक्ति समावेशन ओवी क्रमांक 56 ते 60




चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।
का‍ई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥


चंद्र बिंबावर
चंद्राचा प्रकाश
भेदाचा आभास 
तिथे नसे  112

दीपा विना दीप्ती 
घेण्यास जी जाती 
येई तया हाती 
दीपाची तो 113

मोतियाची किळ । होय मोतियावरी पांगुळ ।
आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
 
मोतीयाचे तेज 
मोतीयाचे रंगी
मोतीपणा अंगी 
शोभतसे 114

 मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु का‍इ केला चिरटिया ?
कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला का‍ई ? ॥ १-५८ ॥

ओंकारी मात्रेचा 
असते त्रिपुटी 
त्यास का म्हणती 
तुकडे ते 115

कार शब्दाला 
तीन रेषा थेट 
म्हणून का भेद
होतो काय 116

अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।
तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥


एकत्वाला धक्का 
नच की लागता 
लाभे सुंदरता  
का न घ्यावी 117

पाण्यावरी फुल 
तरंगाची व्हावी 
का न ती हुंगावी 
पाणीयानी 118

म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।
मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥

म्हणून भुतेश 
आणिक भवानी 
एकच मानूनी 
पाहियली 119

तयात न भेद 
एक पणी एक 
अभिन्न मी होत 
जाणयली 120

00000000000000000000

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...