Wednesday 27 November 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २,सद्गुरू स्तवन,ओवी क्रमांक६ ते १०

 अमृतानुभव,  पद्य भावानुवाद, अध्याय २,सद्गुरू स्तवन,ओवी क्रमांक६ ते १०


सामर्थ्याचेनि बिकें । जो शिवाचेंही गुरुत्व जिंके ।  
आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये ॥ २-६ ॥


गुरूंचे सामर्थ्य
असे ऐसे थोर
जयाच्या समोर
शिव सान॥ १३ ॥

‍आरसा होऊन
आत्मसुख देतो
जीवा घडवतो
ऐसा  लाभ ॥ १४ ॥

बोधचंद्रचिया कळा । विखुरलिया येकवळा ।  
कृपापुनीवलीळा । करी जयाची ॥ २-७ ॥ 
 
 बोध रुपी चंद्र
अनेक कलांनी
राही विखरून
अनेकांगी ॥ १५ ॥

सद्गुरू कृपा
होऊन पूनम
लीलेचे  लाघव
दावीतसे ॥ १६ ॥

{ त्या तया काळी
पावे पूर्णावस्था
ब्रह्म तद्रुपता
शिष्य येथे }॥ १७ ॥

जो भेटलियाचि सवे । पुरति उपायांचे धांवे । 
 प्रवृत्ति-गंगा स्थिरावे । सागरीं जिये ॥ २-८ ॥
 
सरे धावाधाव
येथे तिथे जाणे
भेटताच पेणे
मुक्कामाचे॥ १८ ॥

शोधाचा तो अंत
होऊन अखंड
नांदतो आनंद
त्यामध्ये॥ १९ ॥

जैसी गंगा धावे
सागरा समावे
तिथेच स्थिरावे
मग शांत॥ २० ॥

जयाचेनि अनवसरें । दृष्टाले दृश्याचें मोहिरें ।  
जो भेटतखेंव सरे । बहुरुपचि हें ॥ २-९ ॥
 
भेटता न गुरू
द्रष्टा दृष्यातला
होई जगातला
अंश एक॥ २१ ॥

परी कधी कुठे
सुकृत फळली
भेट जी जाहाली
तया सवे॥ २२ ॥

हरवते जग
पाहण्या सकट
द्रष्टयाचाही अंत
होत असे॥ २३ ॥

अविद्येचें काळवखें । कीं स्वबोध सुदिनें फांके ।  
सीतलें प्रसादार्कें । जयाचेंनि ॥ २-१० ॥

अविद्या काळोख
जाय हरवून
स्वबोध सु दिन
उजेडून॥ २४ ॥

शीतल प्रकाश
प्रसाद जयाचा
हरवे जगाचा
तापत्रय ॥ २५॥



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...