कां बिंब प्रतिबिंबा द्योतक ।
प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।
तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे
॥२६॥
प्रतिबिंब असे
बिंबास कारक
बिंबास द्योतक
प्रतिबिंब ॥ ५४॥
प्रकृती पुरुषी
तैसे द्वैत मिषे
दोन भासतसे
एक चि जे ॥ ५५॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । तो
जिया बाइला केला पुरुषु ।
जेणें दादुलेन सत्ताविशेषु ।
शक्ति जाली ॥२७॥
सर्वही शून्याचा
असे जो निष्कर्षू
परम परेशू
सत्ताधीश ॥ ५६॥
जियेने घेतला
करून दादला
मिळाली तियेला
त्याची शक्ती ॥ ५७॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवींही
शिवपण ।
थारों न शके ते आपण । शिवें
घडिली ॥२८॥
असे प्राणेश्वरी
शिवा जियेविन
नसे शिवपण
असे होय ॥ ५८॥
म्हणून जणू की
शिवे घडविली
धारण हि केली
अंगामध्ये ॥ ५९॥
ऐश्वर्यैसीं ईश्वरा । जियेचें
आंग संसारा ।
आपलाही उभारा । आपणचि जे ॥२९॥
ईश्वरा ऐश्वर्य
दिधले तियेन
संसारा देऊन
आकार या ॥ ६१॥
आपुलिये अंगा
रचिला पसारा
घेऊन उभारा
स्वयं येथे॥ ६२॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि
आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेवढें लेणें ।
नामरूपाचें ॥३०॥
अरूप आपुल्या
पतीला पाहून
गेली ती लाजून
सहजीच॥ ६३॥
म्हणूनया मग
केले मिरवणे
विश्वाचे हे लेणे
अंगावरी॥ ६४॥
******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***
No comments:
Post a Comment