Tuesday 27 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ३१ते३५ (अभंग ६५ते ७७) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ३१ते३५ (अभंग ६५ते ७७) ********** 
अहो अंधारपणाची पैज । सांडूनी अंधार तेज । जाला तैं सहज । सूर्यचि निभ्रांत । ७-३१ ॥ 

दुलांकूडपण सांडलें । आणि आगीपण मांडिलें । तैं तेंचि आगी जालें । इंधन कीं ॥ ७-३२ ॥ 

का गंगा पावत खेंवो । आनपणाचा ठावो । सांडी तैं गंगा हो । लाहे पाणी ॥ ७-३३ ॥ 

तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे । तरी आत्मा असकें असों लाहे । येर्हवीं अज्ञान होये । लागलाचि ॥ ७-३४ ॥ 

आत्मेनसी विरोधी । म्हणोनि नुरेचि इये संबंधीं । वेगळी तरी सिद्धि । जायेचिना ॥ ७-३५॥

*******

अहो अंधाराने
टाकीला अंधार 
काय त्या अंधार 
म्हणावे का ॥६५

टाकता अंधार 
होय तो भास्कर 
निश्चित साकार 
नाही काय ॥६६

दोन लाकडांनी 
अग्नी पेटवून 
अग्नीला धारण 
केले जर॥६७

सरे पेटवण
आणि ते इंधन 
आगची होऊन 
सारे काही ॥६८

वहाळ ओहळ
वाहत जै आले
गंगेला मिळाले 
कुठे जरी ॥६९

तयाचे ते पाणी 
होय गंगा रूप 
आपले स्वरूप 
हरवून ॥७०

34 
अज्ञान न राहे 
अज्ञान ते मुळी 
ज्ञानाच्या जवळी 
येताचि रे ॥७१

सरते अज्ञान 
प्रकाशते ज्ञान 
सरते कारण 
मीमांसाही ॥७२

यावरी जरी का 
ऐसे म्हणे कुणी 
ज्ञान पाजळून 
आपले की ॥७३

होण्याच्या ही आधी 
ज्ञान हे अज्ञान 
अस्तित्व मान 
असेचि ना ॥७४

तयालागि असे 
सांगतो उत्तर 
जे का प्रश्नावर 
साकारते ॥७५

आत्मा व अज्ञान 
विरोधी संपूर्ण 
तया न म्हणून 
संबंधही ॥७६

तसेच अज्ञान 
वेगळे आपण 
राहे कधीच न
ऐसे पहा ॥७७
********
भावानुवादक
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Sunday 25 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६ ते३० (अभंग ५२ते ६४) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६ ते३० (अभंग ५२ते ६४) 
********** 

स्वप्न आणि जागरु । आठउ आणि विसरु । इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ ७-२६ ॥ 

शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट । कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ ७-२७ ॥ 

नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों । तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ ७-२८ ॥

 हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे । तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ ७-२९ ॥

 अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे ? । ऐसीं काईसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ ७-३० ॥ 
+*+*+*

एकाच वेळी का 
स्वप्न व जागृती 
एकत्र राहती
सांगा बरे ॥५२

आठव विसर 
घेऊनिया हात 
आपले हातात 
चालती का ॥५३

एकाच वस्तीला
थंडी वा उष्णता  
काय ही ही वार्ता 
घडे कधी ॥५४

अथवा सूर्याच्या 
किरणांची मोट 
बांधे घनदाट 
अंधार का ॥५५

रात्र व दिवस 
राहि एका ठाई 
ऐसे कधी काही 
घडले का ॥५६

ऐसे जर घडे 
तर कोणी म्हणे 
आत्मा अज्ञानाने 
सिद्ध होय ॥५७

इतकेच काय 
जगणे मरणे
होतील मेहुणे
संबंधाने ॥५८

तरीच आत्म्याच्या 
ठिकाणी अज्ञान 
शब्दा खरे पण 
येऊ शके॥५९

अहो जयाने हा 
आत्मा बाधत से 
काय नांदतसे 
तोची सवे॥६०

ऐसे काहीसे हे
विरुद्ध बोलणे 
एके ठाई होणे 
शक्य नाही ॥६१

(आत्म्याच्या जवळी 
अज्ञानाचा वास 
अथवा अध्यास
शक्य नाही ॥६२
आणि अज्ञान ते 
आहेसे म्हणता 
आत्मा तो तत्वता 
नाही तिथे ॥६३
आत्मा ज्ञानरूप 
स्वयंभू स्वरूप 
तेथे तम ताप 
कैसे राही॥ ६४

**********

भावानुवादक
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

Wednesday 7 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१ ते२५ (अभंग ४२ते ५१) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१ ते२५ (अभंग ४२ते ५१) 
*********


आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी । तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥

अंधार आणून 
घरात कोंडला 
त्यानी जर केला 
ना अंधार ॥४२
तर त्या अंधारा 
म्हणता अंधार 
अंधार अक्षर 
व्यर्थ होय ॥४३

वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे । दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥ 

हाका मारण्यास 
होकार जी देते 
म्हणावे निद्रेते  
काय निद्रा ॥४४
दिवसा आणते 
जी काही उणे 
रात्रीला म्हणणे 
रात्र काय ॥४५

तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके । तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥ 

तैसे या आत्म्यास 
अज्ञान असता 
ज्ञाना न मुकत
तोच जरी ॥४६
अज्ञान लटका 
शब्द हा होईल 
व्यर्थ ची जाईल 
नाम त्याचे ॥४७

येर्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया । कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥ 
आणिक येर्‍हवी
तरी या आत्म्याते
अज्ञान वसते 
म्हणे कोणी ॥४८
ऐसे हे म्हणणे 
पाहता तर्काने 
चूक येणे माने 
ठरलेली ॥४९

अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी । आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥

अज्ञान म्हणजे 
तमाची मिळणी 
प्रकाशाची खाणी 
ज्ञान असे ॥५०

प्रकाश अंधार
वसे एक साथ 
अहो ही तो बात 
अशक्यचि॥५१ 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







Thursday 1 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६ ते २०(अभंग ३३ते ४१) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६ ते २०(अभंग ३३ते ४१)
 **********

आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? । सुषुप्ती सुषुप्तया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ ७-१६ ॥ तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें । तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ ७-१७ ॥ ना तरी अज्ञान येक घडे । हें जयास्तव निवडे । तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ ७-१८ ॥ पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा । तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ ७-१९ ॥ इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी । तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥ ७-२०॥

१६
रवीला ग्रासिले 
म्हणती मेघाने 
कळे प्रकाशाने 
कवण्या हे  ॥३३॥
निजलेल्या वर 
निज चि रुसली
तो तिये जाणली
सांगा कुणी ॥३४॥
१७
तसे हे अज्ञान 
असेल कि जिथे 
तेच रूप  घेते 
संपूर्णतः ॥३५॥
अज्ञान मुळीच
कळेना अज्ञाना 
नेणिवेच्या गुणा
वाया गेले ॥३६॥
१८
अज्ञान आहे हे 
जयाने कळते
ज्ञानाचे चोखडे 
रूप तेची ॥३७॥
डोळ्यास पडळ 
येउनिया जर 
दृष्टीचा वावर 
सर्व स्थळी ॥३८॥
तयाला आंधळा 
म्हणणे हे खोटे 
अन पडळ ते 
लटकेचि ॥३९॥
२०
आगीत टाकले 
इंधन लाकडे 
नच धडधडे 
पेटुनिया ॥४०॥
तरी त्या इंधन 
शक्तीला इंधन 
घेणे म्हणवून 
व्यर्थ जैसे॥४१॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...