अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१ ते२५ (अभंग ४२ते ५१)
*********
आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी । तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥
अंधार आणून
घरात कोंडला
त्यानी जर केला
ना अंधार ॥४२
तर त्या अंधारा
म्हणता अंधार
अंधार अक्षर
व्यर्थ होय ॥४३
वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे । दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥
हाका मारण्यास
होकार जी देते
म्हणावे निद्रेते
काय निद्रा ॥४४
दिवसा आणते
जी काही उणे
रात्रीला म्हणणे
रात्र काय ॥४५
तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके । तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥
तैसे या आत्म्यास
अज्ञान असता
ज्ञाना न मुकत
तोच जरी ॥४६
अज्ञान लटका
शब्द हा होईल
व्यर्थ ची जाईल
नाम त्याचे ॥४७
येर्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया । कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥
आणिक येर्हवी
तरी या आत्म्याते
अज्ञान वसते
म्हणे कोणी ॥४८
ऐसे हे म्हणणे
पाहता तर्काने
चूक येणे माने
ठरलेली ॥४९
अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी । आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥
अज्ञान म्हणजे
तमाची मिळणी
प्रकाशाची खाणी
ज्ञान असे ॥५०
प्रकाश अंधार
वसे एक साथ
अहो ही तो बात
अशक्यचि॥५१
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
No comments:
Post a Comment