Sunday 25 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६ ते३० (अभंग ५२ते ६४) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २६ ते३० (अभंग ५२ते ६४) 
********** 

स्वप्न आणि जागरु । आठउ आणि विसरु । इयें युग्में येका हारु । चालती जरी ॥ ७-२६ ॥ 

शीता तापा एकवट । वाहे वस्तीची वाट । कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ ७-२७ ॥ 

नाना राती आणि दिवो । येती येके ठाईं राहों । तैं आत्मा जिवें जिवो । अज्ञानाचेनि ॥ ७-२८ ॥

 हें असो मृत्यु आणि जिणें । इयें शोभती जरी मेहुणे । तरी आत्मेनि असणें । अज्ञानेंसि ॥ ७-२९ ॥

 अहो आत्मेन जे बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे ? । ऐसीं काईसीं विरुद्धें । बोलणीं इयें ॥ ७-३० ॥ 
+*+*+*

एकाच वेळी का 
स्वप्न व जागृती 
एकत्र राहती
सांगा बरे ॥५२

आठव विसर 
घेऊनिया हात 
आपले हातात 
चालती का ॥५३

एकाच वस्तीला
थंडी वा उष्णता  
काय ही ही वार्ता 
घडे कधी ॥५४

अथवा सूर्याच्या 
किरणांची मोट 
बांधे घनदाट 
अंधार का ॥५५

रात्र व दिवस 
राहि एका ठाई 
ऐसे कधी काही 
घडले का ॥५६

ऐसे जर घडे 
तर कोणी म्हणे 
आत्मा अज्ञानाने 
सिद्ध होय ॥५७

इतकेच काय 
जगणे मरणे
होतील मेहुणे
संबंधाने ॥५८

तरीच आत्म्याच्या 
ठिकाणी अज्ञान 
शब्दा खरे पण 
येऊ शके॥५९

अहो जयाने हा 
आत्मा बाधत से 
काय नांदतसे 
तोची सवे॥६०

ऐसे काहीसे हे
विरुद्ध बोलणे 
एके ठाई होणे 
शक्य नाही ॥६१

(आत्म्याच्या जवळी 
अज्ञानाचा वास 
अथवा अध्यास
शक्य नाही ॥६२
आणि अज्ञान ते 
आहेसे म्हणता 
आत्मा तो तत्वता 
नाही तिथे ॥६३
आत्मा ज्ञानरूप 
स्वयंभू स्वरूप 
तेथे तम ताप 
कैसे राही॥ ६४

**********

भावानुवादक
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...