Thursday, 1 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६ ते २०(अभंग ३३ते ४१) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १६ ते २०(अभंग ३३ते ४१)
 **********

आभाळें भानु ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ? । सुषुप्ती सुषुप्तया रुसे । तैं तेचि कोणा ? ॥ ७-१६ ॥ तैसें अज्ञान असे जेथें । तेंचि जरी अज्ञान आतें । तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ ७-१७ ॥ ना तरी अज्ञान येक घडे । हें जयास्तव निवडे । तें अज्ञान नव्हे फुडे । कोणे काळीं ॥ ७-१८ ॥ पडळही आथी डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा । तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥ ७-१९ ॥ इंधनाच्या आंगीं । खवळलेन आगी । तें न जळे तैं वाउगी । शक्तिचि ते ॥ ७-२०॥

१६
रवीला ग्रासिले 
म्हणती मेघाने 
कळे प्रकाशाने 
कवण्या हे  ॥३३॥
निजलेल्या वर 
निज चि रुसली
तो तिये जाणली
सांगा कुणी ॥३४॥
१७
तसे हे अज्ञान 
असेल कि जिथे 
तेच रूप  घेते 
संपूर्णतः ॥३५॥
अज्ञान मुळीच
कळेना अज्ञाना 
नेणिवेच्या गुणा
वाया गेले ॥३६॥
१८
अज्ञान आहे हे 
जयाने कळते
ज्ञानाचे चोखडे 
रूप तेची ॥३७॥
डोळ्यास पडळ 
येउनिया जर 
दृष्टीचा वावर 
सर्व स्थळी ॥३८॥
तयाला आंधळा 
म्हणणे हे खोटे 
अन पडळ ते 
लटकेचि ॥३९॥
२०
आगीत टाकले 
इंधन लाकडे 
नच धडधडे 
पेटुनिया ॥४०॥
तरी त्या इंधन 
शक्तीला इंधन 
घेणे म्हणवून 
व्यर्थ जैसे॥४१॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...