Friday 30 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९६ते १००(अभंग २०९ते२१९)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ९६ते १००, (अभंग २०९ते२१९ )   

96

अगा चंद्रापासून उजळ । जेणें राविली वस्तु धवळ । तयातें काजळ । म्हणिजतसे ॥ ७-९६ ॥

 जर चंद्राहून

वस्तू ती उजळ 

धुऊन सोज्वळ 

केली कुणी ॥२०९


तरी तिजलागी 

म्हणावे काजळ 

याहून गोंधळ 

काय असे ॥२१०


97 

आगीचे काज पाणी । निफजा जरी आणी । अज्ञान इया वहणी । मानूं तरी तें ॥ ७-९७ ॥ 


आगीचे ते काम

 जर असे पाणी 

तर ही कहाणी 

सत्य होय ॥२११


हि अज्ञानातून 

दृश्य विस्तारली 

साकार जाहल 

स्वयंमेव ॥२१२


98 

कळीं पूर्ण चंद्रमा । आणून मेळवी अमा । तरी ज्ञान हें अज्ञान नामा । पात्र होईजे ॥ ७-९८ ॥


पौर्णिमेचा चंद्र 

अमावस्या आणी

तरही कहाणी 

सत्य होय ॥२१३


ज्ञाना अज्ञानाची

साम्यता लाभून 

घेई अभिधान

त्याचेच की ॥२१४


99 

वोरसोनि लोभें । विष कां अमृतें दुभे । ना दुभे तरी लाभे । विषचि म्हणणें ॥ ७-९९ ॥


प्रेमे जर पान्हा 

फुटला विषाला 

वर्षे अमृताला 

काय कधी ॥२१५


विषरुपी धेनु 

दोहन करता 

विषची तत्वता 

मिळणार ॥२१६

100 

तैसा जाणणेयाचा वेव्हारू । जेथें माखला समोरु । तेथें आणिजे पुरू । अज्ञानाचा ॥ ७-१०० ॥     

ज्ञान व्यवहार 

जिथे भरलेला 

ठाव न उरला 

अन्य कशा ॥२१७


तरी तेथे काय 

अज्ञानाचा पूर 

आला भरपूर 

म्हणावे का ॥२१८


(दृष्य आणि दृष्टा 

एकत्र मिळून 

चिद्रुप भरून

जगी राही ॥२१९)

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com

Thursday 29 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९१ते ९५, (अभंग १९८ते२०८ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ९१ते ९५, (अभंग १९८ते२०८ )   

🌺🌺🌺🌺

 भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥ 

तरी भरंवसेनि मुळें  पाणी घेती हें  टळें  तैसें अज्ञान कळें  दृष्यास्तव  -९२ 

 चेइलिया नीद जाये  निद्रिता तंव ठाउवी नोहे  परी स्वप्न दाऊनि आहे  म्हणों ये कीं  -९३ 

 म्हणोन वस्तुमात्रें चोखें  दृश्य जरी येव्हडें फांके  तेव्हां अज्ञान आथी सुखें  म्हणों ये कीं  -९४  

अगा ऐसिया ज्ञानातें  अज्ञान म्हणणें केउतें  काय दिवो करी तयातें  अंधारु म्हणिपे ?  -९५ 

🌳🌳🌳

91 

भुमीतून वृक्ष

पाणी घे शोषून 

येतसे दिसून 

पाहताना ॥१९८॥

वृक्षाची पालवी 

पाहता कळते 

पाणी ते मिळते 

तयालागि॥१९९

92 

येणेवरी कळे

मातीतील पाणी 

वृक्षाच्या जीवनी

आधार ती ॥२००

तैसेचि अवघे 

दृश्य हे पाहून 

अज्ञान कळून 

येई इथे॥२०१

93 

जागृतास नाही 

निद्रेची माहिती 

निद्रितास रिती 

निद्रेची वा॥२०२

परी जागृतीत 

स्वप्न आठवती 

तयाने ती  पुष्टि

होय निद्रे ॥२०३

94

तयापरी पाही 

शुद्ध वस्तू ठायी

दृश्य पसाराही 

असेचि ना ॥२०४

तर मग तिथे 

अज्ञान असते 

म्हणता हे येते 

नाही काय॥२०५

 95 

तया या प्रश्नाला 

उमटे उत्तर 

सिद्धांता सकट 

असे पाही ॥२०६

अगा हे बोलणे

अवघेचि  ज्ञान

तयाला अज्ञान 

म्हणावे का?॥२०७

करतो प्रकाश 

सार्‍या या जगास 

अंधार तयास 

म्हणावे का?॥२०८

🌾🌾🌾

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


Wednesday 28 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ८६ते ९०, (अभंग १८८ते१९७ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ८६ते ९०, (अभंग १८८ते१९७ )   

86

आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें । वस्तु ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ ७-८६ ॥ 


 न पाहे आपना 

अन आणिकाला 

ऐसे जी वदला 

आत्मवस्तु ॥१८८॥

दृष्टा जिथे नाही 

दृश्यही ते नाही 

सोडून दोन्हीही 

पल्याड ती ॥१८९

87 

तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हडें । आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ ७-८७ ॥ 

तर मग कशी

आपल्या पुढती 

दृश्य विस्तारती 

ती ही इथे ॥१९०

आणिक त्या दृश्या 

कशी पाहताती

स्वये स्विकारती

दृष्टुत्वाशी ॥१९१

88 

जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हडें । उठिलें तरी रोकडें । देखतसों ॥ ७-८८ ॥ 


आत्म्यास आत्मा हे 

बोलणे कठीण 

येतात कुठून 

मग सारे ॥१९२

प्रत्यक्ष दिसती 

पाहता कळती 

ययाची उत्पत्ती 

काय असे ॥१९३

89 

न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन । यया दृश्यानुमान । प्रमाण जालें ॥ ७-८९ ॥

जरी का डोळ्याला 

न दिसे अज्ञान 

तरी नव्हे आन 

आहे ची ते ॥१९४

दिसते जयाला 

तया अनुमान 

मानती प्रमाण 

सुज्ञ सारे ॥१९५

90 


 ना तरी चंद्रु येक असे ।तो व्योमीं दुणावला दिसे । तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ ७-९० ॥ 

जरी आकाशात 

एक चंद्र असे 

परी दोन दिसे 

कोणास तो ॥१९६

तरी तयाच्या त्या 

नेत्री दोष आहे 

होते सिद्ध ना हे

अनुमानी॥१९७॥

🌾🌾
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🎶✨✨✨🎶

Monday 26 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ८१ते ८५, (अभंग १७८ते१८७ )

 

  


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ८१ते ८५, (अभंग १७८ते१८६ )   
*******

अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये शोभे । कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ ७-८१॥  । 


चंद्र अवसेचा 
जर का देईन
सुंदर चांदणं 
शोभीवंत ॥१७८

अथवा सशाच्या 
डोईच्या शिंगांनी 
मंडप बांधूनी
घेई कोणी ॥१७९

८२

 नाना गगनौलाचिया माळा । वांजेच्या जालया गळा । घापती तो सोहळा । पाविजत असे ॥ ७-८२ ॥ 

आकाश फुलांच्या 
नानाविध माळा 
मिरवितो गळा 
वंध्या पुत्र ॥१८०

८३

आणून कांसवीचें तुप । भरू आकाशाचें माप । तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ७-८३ ॥ 

कोणी का आणून 
कासवीचे तूप 
आकाशीचे माप 
भरू जाय ॥१८१

तरीच संकल्प 
अज्ञान मागचा 
होता रे साचा 
पूर्णपणे ॥१८२

84 

आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती । तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥ 

आम्ही पुन्हा पुन्हा 
येऊन जाऊन 
अज्ञान बोलून 
सांगू जावे ॥१८३

नये ची बोलता 
सिद्ध वा करता 
तर मग बाता 
कशाला या ॥१८४

85 

म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें । परी आन येक स्फुरे । इयेविषयीं ॥ ७-८५ ॥ 

म्हणुनी अज्ञान 
बोलण्या अक्षरे 
जेव्हा न स्फुरे 
यावरती ॥१८५

तरी  एक आण
तर्क येथ उपजे 
म्हणूनी बोलीजे 
तुम्हा प्रति ॥१८६

*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
**************

Sunday 25 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ७६ते ८०, (अभंग १६८ते१७७ )

    


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ७६ते ८०, (अभंग १६८ते१७७ )   

७६ 

तेवीं पाहावया अज्ञान ऐसें ।हें आंगीं पिसें काइसें । न पाहतां आपैसें ।न पाहणेंचि कीं ॥ ७-७६ ॥


तयापरी अज्ञान 

पाहण्यास जाणे

व्यर्थची शिणणे

वेडेपणी  ॥१६८

शोध शोधूनी वा

शोधल्या वाचुनी 

ठाव तो अज्ञानी 

नाही येथे ॥१६९

७७

एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ ७-७७ ॥

तेणे परी इथे

अज्ञान हा भाव 

विचाराचा गाव 

पाहीचिना ॥१७०

७८

अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें । विचाराचे डोळे । देखते का ? ॥ ७-७८ ॥

अज्ञान आत्म्यात 

अथवा वेगळे 

राही हे सगळे 

बोल व्यर्थ ॥१७१

काही केले तरी 

विचाराचे डोळे 

पाहू न शकले 

तयालागि ॥१७२

७९

ना निर्धाराचें तोंड न माखे ।प्रमाण स्वप्नींही नाइके । कीं निरुती हन मुके ।अनसाईपणा ॥ ७-७९ ॥ 

निर्धार मांडून 

अज्ञान शोधले 

परी ना गावले 

शब्दामाजी॥१७३

आणिक प्रमाणे

लाख मांडियली 

स्वप्नी न दिसली 

तयातही ॥१७४

तया मोजमाप 

घडेना वर्णन 

नाहीच अज्ञान 

वस्तू ऐसी ॥१७५

80

इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु ।निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ ७-८० ॥

कसा तरी इथे 

अज्ञानाचा पत्ता 

जर का लागता

तर बरे ॥१७६

मुळात नाही जे

तया शोधू जाता 

काय ते रे हाता 

येते देवा ?॥१७७॥

******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
**************

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...