Wednesday 28 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ८६ते ९०, (अभंग १८८ते१९७ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ८६ते ९०, (अभंग १८८ते१९७ )   

86

आपणया ना आणिकातें । देखोनि होय देखतें । वस्तु ऐसिया पुरतें । नव्हेचि आंगें ॥ ७-८६ ॥ 


 न पाहे आपना 

अन आणिकाला 

ऐसे जी वदला 

आत्मवस्तु ॥१८८॥

दृष्टा जिथे नाही 

दृश्यही ते नाही 

सोडून दोन्हीही 

पल्याड ती ॥१८९

87 

तरी ते आपणयापुढें । दृश्य पघळे येव्हडें । आपण करी फुडें । द्रष्टेपणें ॥ ७-८७ ॥ 

तर मग कशी

आपल्या पुढती 

दृश्य विस्तारती 

ती ही इथे ॥१९०

आणिक त्या दृश्या 

कशी पाहताती

स्वये स्विकारती

दृष्टुत्वाशी ॥१९१

88 

जेथ आत्मत्वाचें सांकडे । तेथ उठे हें येव्हडें । उठिलें तरी रोकडें । देखतसों ॥ ७-८८ ॥ 


आत्म्यास आत्मा हे 

बोलणे कठीण 

येतात कुठून 

मग सारे ॥१९२

प्रत्यक्ष दिसती 

पाहता कळती 

ययाची उत्पत्ती 

काय असे ॥१९३

89 

न दिसे जरी अज्ञान । तरी आहे हें नव्हे आन । यया दृश्यानुमान । प्रमाण जालें ॥ ७-८९ ॥

जरी का डोळ्याला 

न दिसे अज्ञान 

तरी नव्हे आन 

आहे ची ते ॥१९४

दिसते जयाला 

तया अनुमान 

मानती प्रमाण 

सुज्ञ सारे ॥१९५

90 


 ना तरी चंद्रु येक असे ।तो व्योमीं दुणावला दिसे । तरी डोळां तिमिर ऐसें । मानूं ये कीं ॥ ७-९० ॥ 

जरी आकाशात 

एक चंद्र असे 

परी दोन दिसे 

कोणास तो ॥१९६

तरी तयाच्या त्या 

नेत्री दोष आहे 

होते सिद्ध ना हे

अनुमानी॥१९७॥

🌾🌾
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🎶✨✨✨🎶

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...