Sunday 25 April 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ७६ते ८०, (अभंग १६८ते१७७ )

    


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ७६ते ८०, (अभंग १६८ते१७७ )   

७६ 

तेवीं पाहावया अज्ञान ऐसें ।हें आंगीं पिसें काइसें । न पाहतां आपैसें ।न पाहणेंचि कीं ॥ ७-७६ ॥


तयापरी अज्ञान 

पाहण्यास जाणे

व्यर्थची शिणणे

वेडेपणी  ॥१६८

शोध शोधूनी वा

शोधल्या वाचुनी 

ठाव तो अज्ञानी 

नाही येथे ॥१६९

७७

एवं कोण्हेही परी । अज्ञानभावाची उजरी । न पडेचि नगरीं । विचाराचिये ॥ ७-७७ ॥

तेणे परी इथे

अज्ञान हा भाव 

विचाराचा गाव 

पाहीचिना ॥१७०

७८

अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळें । विचाराचे डोळे । देखते का ? ॥ ७-७८ ॥

अज्ञान आत्म्यात 

अथवा वेगळे 

राही हे सगळे 

बोल व्यर्थ ॥१७१

काही केले तरी 

विचाराचे डोळे 

पाहू न शकले 

तयालागि ॥१७२

७९

ना निर्धाराचें तोंड न माखे ।प्रमाण स्वप्नींही नाइके । कीं निरुती हन मुके ।अनसाईपणा ॥ ७-७९ ॥ 

निर्धार मांडून 

अज्ञान शोधले 

परी ना गावले 

शब्दामाजी॥१७३

आणिक प्रमाणे

लाख मांडियली 

स्वप्नी न दिसली 

तयातही ॥१७४

तया मोजमाप 

घडेना वर्णन 

नाहीच अज्ञान 

वस्तू ऐसी ॥१७५

80

इतुलियाही भागु । अज्ञानाचा तरी तो मागु ।निगे ऐसा बागु । पडतां कां देवा ॥ ७-८० ॥

कसा तरी इथे 

अज्ञानाचा पत्ता 

जर का लागता

तर बरे ॥१७६

मुळात नाही जे

तया शोधू जाता 

काय ते रे हाता 

येते देवा ?॥१७७॥

******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
**************

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...