Showing posts with label ज्ञानेश्वर. Show all posts
Showing posts with label ज्ञानेश्वर. Show all posts

Sunday, 25 July 2021

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  .
*****
आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला 
अभ्यास चालला  लिहूनिया॥१

योगायोग बरा जुळून हा आला 
तेणे या मनाला  तोष झाला ॥२

काय किती कळले आत उतरले  
जरी न उमजले मज लागी ॥३

परी झाली सोबत ज्ञानदेवा संगत 
शब्दांशी खेळत अनायसे ॥४

येणे सुखावलो भुके व्याकुळलो 
दारी मी पातलो मावूलीच्या ॥५

पांडुरंगा दत्ता विक्रांत हा चित्ता
स्वरुपात आता वास करो  ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



)



Monday, 5 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,११ते १५ (अभंग१९ ते २७ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,११ते १५ (अभंग१९ ते २७   ) 
💮💮💮💮💮💮

परी आरिसा शिवे शिवे । तंव दिठीसी दिठी फावे । तैसे झाले धांवे । वृत्तीचे या ॥ ९-११ ॥ 

जशी काय दृष्टी 
शिवे आरशाला 
त्याच त्या क्षणाला 
फिरे मागे ॥१९

तयाची प्रमाणे 
इंद्रिय वृत्तींचा 
विषय भोगाचा 
व्यवहार॥२०

नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥ 

नाग मुदी आणि
लेणे कंकणाचे 
वेगळे तयाचे 
लिंग रूप ॥२१

अन अलंकार 
जरी घेऊ जाता 
सोने  येते हाता 
प्रत्यक्षात ॥२२

वेंचूनि आणूं कल्लोळ । म्हणोन घापे करतळ । तेथें तरी निखळ । पाणीच फावे ॥ ९-१३ ॥ 

हाती घेता जावे 
पाण्याचे कल्लोळ 
हातात केवळ 
पाणी येते॥२३

हातापाशीं स्पर्शु । डोळ्यापाशीं रूपसु । जिव्हेपाशीं मिठांशु । कोण्ही एकू ॥ ९-१४ ॥

स्पर्शते हातास 
डोळ्याने रूपास 
जिभेने चवीस
काही कळे॥२४

 तर्ही परिमळापरौतें । मिरवणें नाहीं कापुरातें । तेवीं बहुतांपरी स्फुरतें । तेंचि स्फुरे ॥ ९-१५ ॥

परी तो कापूर 
तयाच्या ठिकाणी 
सुगंधा वाचूनी 
काय असे ॥२५

तयापरी बहु 
दिसे रुप गुणे 
गोष्टी त्या आनाने 
प्रत्ययासी॥२६

परी मूळ असे 
एक आत्मतत्त्व 
स्फुरण  रूपात 
ज्ञानमय ॥२७


🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Saturday, 3 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६ते १० (१०अभंग ते १८ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,६ते १०  (१०अभंग ते १८  ) 
💮💮💮💮💮💮

चूतांकूर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ । रस झाले सकळ । रसनावंत ॥ ९-६ ॥ 

आंब्याची कोवळी
पाने हो कोकीळ 
वा मलयानिल 
अंग स्वतः ॥१०

षडरस सारे 
होऊनिया भोक्ते 
आप आपणाते 
चाखू जाती॥११

तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । हें सरलें अद्वैता । अफुटामाजीं ॥ ९-७ ॥ 

तया परी इथे 
भोग्य अन भोक्ता 
दिसणे देखता 
एक रूप ॥१२

सरुनिया द्वैत 
हरुनिया भेद 
अखंड ब्रम्हात 
एक रस ॥१३

सेवंतेपणा बाहेरी । न निगताचि परी । पाती सहस्रवरी । उपलविजे ते ॥ ९-८ ॥ 

अगा शेवंतीस 
हजार पाकळ्या 
जरी का असल्या 
शोभीवंत ॥१४

तरी त्या शेवंती -
पण न टाकती
धरुनी राहती 
सर्वकाळ॥१५

तैसें नव नवा अनुभवीं । वाजतां वाधावी । अक्रियेच्या गांवीं । नेणिजे तें ॥ ९-९ ॥ 

लाख उपजले 
जरी भोग्य भोक्ता 
नवनव्या सत्ता-
मध्ये जरी ॥१६

अक्रियेच्या गावी 
परी ब्रह्मवेत्ता 
क्रिया ती तत्वता 
घडेचिना॥१७

म्हणोनि विषयांचेनि नांवें । सूनि इंद्रियांचे थवे । सैंघ घेती धांवे । समोरही ॥ ९-१० ॥ 

जरी का दिसती 
इंद्रिय धावती 
विषय सेविती 
पूर्ण येथे ॥१८

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Wednesday, 30 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण(संपूर्ण) ओव्या , १६ते १९ (अभंग ३१ते ४०)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण  (संपूर्ण)  ओव्या १६ते १९ (अभंग ३१ते ४०) 
💮💮💮💮💮💮


तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे । आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥ ८-१६ ॥

जेथे मुळातून 
काही न समजे 
अज्ञान  म्हणिजे 
आहे तिथे ॥३१

परंतु सर्वही 
जयाने उमजे 
अज्ञान म्हणिजे 
कैसे तया ॥३२॥

 ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें । ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ ८-१७ ॥ 

आणिक ज्ञान हे 
जाता अज्ञानात 
अज्ञान उरत 
नाही तिथे ॥३३

सरता अज्ञान 
ज्ञान ते कुठले 
ते हि हरवले 
होते सवे॥३४

आणि जाणे तोचि नेणें । नेणे तोचि जाणे । आतां कें असे जिणें । ज्ञानाज्ञाना ? ॥ ८-१८ ॥ 

ज्ञाना वा अज्ञाना
नाहीच अस्तित्व 
कळते हे स्पष्ट 
आता इथे ॥३५

म्हणून बोले जो 
अरे मी जाणतो 
तोचि तो नेणतो 
हेचि खरे ॥३६

नेणे मी म्हणतो
मौन ही राहतो 
तोचि तो जाणतो 
हेही खरे ॥३७

खरे तो नेणणे
आणिक जाणणे 
मिळूनी जे होणे 
तीच वस्तू॥३८

एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी । उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥ 

अज्ञान अंधार 
ज्ञानाचा प्रकाश 
अवघे आकाश 
जया पोटी ॥३९

त्या चिद्गगगनी
चैतन्य आदित्य 
असे प्रकाशित 
उदेजेला॥४०

॥इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं संपूर्णम् ॥

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

 

Monday, 28 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , ६ते १० (अभंग १२ते २० ) 💮💮💮💮💮💮


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , ६ते १० (अभंग १२ते २०  ) 
💮💮💮💮💮💮

 आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो । तैं आमुतें न देखों । आम्हीपण ॥ ८-६ ॥ 

आम्हीच आपणा
पाहू न शकतो 
शोधी हरवतो 
आपल्यात ॥१२

तर आपणास
विषय करून 
भोगू ही शकेन 
ऐसा कोण॥१३


प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलावो । परी कैसेनिही विपावो । असणयाचा ॥ ८-७ ॥ 

प्रकट व्हावे की 
लपून बसावे 
शब्दात सांगावे 
होत नाही ॥१४

काहीही करून 
स्थितीचे वर्णन 
येईना घडून 
ऐसे येथे॥१५


किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥ 

किंबहुना मज 
वर्णवेना स्थिती 
दिली श्री निवृत्ती 
कृपा कर॥१६

तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडू कासया । केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ॥ ८-९ ॥

ऐसीया स्थितीच्या
सामोरी यायला 
धीर अज्ञानाला 
कुठून येतो ॥१७

अज्ञान नसता 
माया ही मरते  
जिवंत केवुते
होय पुन्हा॥१८

 अज्ञानचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु । तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥ ८-१० ॥

नाहीच ठाऊक 
जयाच्या बाबत 
तयात या गावात 
ज्ञान जाता ॥१९

तरी त्याचा तिथे 
होईल गौरव 
घडणे संभव 
नाही जैसे॥२०

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

Sunday, 27 June 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , १ते ५ (अभंग १ ते११ )

प्रकरण आठवें ज्ञानखण्डन 
सुरुवात 
*******
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ८वा ज्ञानखंडण ओव्या , १ते ५ (अभंग १ ते११ ) 

तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे । आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ ८-१ ॥

ऐसे गुरुदेवे
केले आम्हा ठायी
अज्ञानाचे नाही 
ज्ञान तेही ॥१

आम्हीच आमच्या 
स्वरूपी संपूर्ण 
भान हरपून 
दोघांचे ही ॥२

 परी आम्हा आम्ही आहों । तें कैसें पाहो जावों । तंव काय कीजे ठावो । लजिजे ऐसा ॥ ८-२ ॥ 

आहे तरी काय 
आपले स्वरूप 
पाहण्यास आप 
गेलो आम्ही ॥३

तरी पाहणे ते 
गेले मावळून 
जणूकी लाजून 
ठायीची रे ॥४

हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें । जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥ ८-३ ॥ 

ऐसी कृपा केली 
प्रभू गुरुदेवे
शब्दात वर्णावे 
होईना ते ॥५

ऐसी या स्थितीत 
ठेविले आम्हाला 
पूर आनंदाला 
आला जणू ॥६

आम्ही आमच्यात 
नाही सामावत
फक्त आनंदात 
आनंदतो॥७

अहो आत्मेपणीं न संटो । स्वसंविति न घसवटो । आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥ ८-४ ॥

आम्हा न सहावे 
आत्मत्व कल्पना 
स्वरूप  बोलांना
जागा नाही ॥८

आणि म्हणू जावे 
यास मोक्षस्थिती 
तर या शब्दाती 
नुरू देती॥९

 आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी । आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥ ८-५ ॥

आमच्या स्थितीचे 
करील जो गोष्टी 
शब्दांची त्या सृष्टी 
झाली नाही ॥१०

आणिक आमची 
पाहिल जो स्थिती 
नाहीच गा दृष्टी 
जगी इया॥११

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...