Sunday 18 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ६६,ते७१ (अभंग १३९ते १५१ ) ९ .अ.संपूर्ण

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ६६,ते७१  (अभंग १३९ते १५१  ) 
💮💮💮💮💮💮
 चेतचि मा चेवविलें । निदैलेंचि मा निदविलें । आम्हीचि आम्हा आणिलें । नवल जी तुझें ॥ ९-६६ ॥ 

असता जागृत 
जागविले मजला 
असता झोपला 
झोपविले ॥१३९

आणले आम्हाला 
निजाच्या घराला 
ऐसिया नवला 
दावियले ॥१४०

आम्ही निखळ मा तुझे । वरी लोभें म्हणसी माझें । हें पुनरुक्त साजे । तूंचि म्हणोनी ॥ ९-६७ ॥ 

जरी आम्ही आहो 
निखळ ते तुझे 
प्रेमे म्हणे माझे 
तरी तूच ॥१४१

ऐसे हे बोलणे 
पुन्हा रे सांगणे 
तुलाच शोभणे 
घडे प्रभू ॥१४२



कोणाचें कांहीं न घेसी । आपुलेंही तैसेंचि न देसी । कोण जाणे भोगिसी । गौरव कैसें ॥ ९-६८ ॥ 

कुणाचे तू काही 
दिसशी न घेता 
कुणास ते देता 
किंवा काही ॥१४३

परी भोगे कैसा
गौरव एतुला
गुरु शिष्यातला 
आश्चर्य चि ॥१४४

गुरुत्वें जेवढा चांगु । तेवढाचि तारूनि लघु । गुरु लघु जाणे जो पांगु । तुझा करी ॥ ९-६९ ॥ 

गुरुत्वे चांगला 
समर्थ तू भला 
तारण्या सर्वाला 
लघु झाला ॥१४५

लघुगुरू भेद 
कळेना तयाला 
तव स्वरूपाला 
जाणे ना जो ॥१४६

शिष्यां देतां वाटे । अद्वैताचा समो फुटे । तरी काह्या होती भाटें । शास्त्रें तुझीं ॥ ९-७० ॥ 

आपुल्या शिष्याला 
ज्ञानाचे भांडार 
वाटता अपार 
जरी प्रेमे ॥१४७

वाटतांना परी 
अद्वैत मोडेना 
एकत्व सोडेना 
काही केल्या ॥१४८

म्हणुनिया शास्त्रे 
होऊनिया भाट
कीर्तीला गातात 
तुझ्या प्रभू ॥१४९

किंबहुना ये दातारा । तूं याचा संसारा । वेंचोनि होसी सोयरा । तेणेंचि तोषें ॥ ९-७१ ॥ 

फार काय सांगू 
निवृत्ती दातारा 
सांडिले संसारा
मी तू पण ॥१५०

झालास सोयरा 
माझा प्रियकर 
आनंद अपार 
होई येणे ॥१५१

॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‌अमृतानुभवे जीवन्मुक्तदशाकथनं नाम नवमं प्रकरणं संपूर्णम् ॥


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...