Thursday 8 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,२६ते ३० (अभंग ४९ ते ६०)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,२६ते ३० (अभंग ४९ ते ६०) 
💮💮💮💮💮💮


 चंद्र वेचूं गेला चांदिणें । तंव वेंचिलें काय कोणें । विऊनि वांझें स्मरणें । होतीं जैसी ॥ ९-२६ ॥

चंद्र जर गेला 
वेचाया चांदणे 
काय त्या वेचणे 
म्हणावे गा ॥४९

विचार येतात 
विचार जातात 
लाभ काय त्यात 
कुणा असे॥५०

 प्रत्याहारादि अंगीं । योगें आंग टेंकिलें योगीं । तो जाला इये मार्गी । दिहाचा चांदु ॥ ९-२७ ॥ 

प्रत्याहार आदी
योगाची साधन 
येतात शरण 
तया योग्या ॥५१

योग साधनेही 
ज्ञानीया पुढती 
चंद्रची दिसती 
दिनमानी ॥५२

येथ प्रवृत्ति बहुडे जिणें । अप्रवृत्तीसी वाधावणें । आतां प्रत्यङ्मुखपणें । प्रचारु दिसे ॥ ९-२८ ॥

ऐशीया स्थितीची 
प्राप्ती जै घडते 
आयुष्य सरते 
प्रवृत्तीचे ॥५३

आणिक सहज 
मग प्रवृत्तीते
जणू शोभा येते 
तया ठायी ॥५४

यया ज्ञानियाचा 
दिसतो घटीत 
व्यवहार नीट 
चाललेला ॥५५

चाले परी कैसा 
दृष्टी अंतर्मुख 
नाही सुख दुःख 
तिळमात्र ॥५६

 द्वैतदशेचें आंगण । अद्वैत वोळगे आपण । भेद तंव तंव दुण । अभेदासी ॥ ९-२९ ॥ 

द्वैताच्या अंगणी 
अद्वैत चाकरी 
वाटतसे करी 
आपलीच ॥५७

वाढविला भेद 
जितुक्या पटीत 
वाढ अभेदात  
दुणी होय ॥५८

कैवल्याचा चढावा । करीत विषयसेवा । झाला भृत्य भज्य कालोवा । भक्तीच्या घरीं ॥ ९-३० ॥

कैवल्याहून ती 
असे त्याची स्थिती 
परी दिसे वृत्ती 
विषयात  ॥५९

अभेद भक्तीचा 
जणूकी घटात 
देव आणि भक्त 
ऐक्य होय ॥६०

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...