Thursday 15 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,५१ते५५ (अभंग१०३ ते ११६ )

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,५१ते५५  (अभंग१०३ ते ११६   ) 
💮💮💮💮💮💮

 म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे । निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥ 

उपनिषदे ही 
जे काही बोलती 
निंदाच गमती 
जणू काही  ॥१०३

वर्णनातीत जी 
असे काही स्थिती 
बोलता शब्दाती 
निंदाच ना ॥१०४

म्हणता म्हणत
निंदा या शब्दास 
स्तुतिचाच भास
होतो काही१०५

असे शब्द काही 
निंदा म्हणून ती  
स्तुतीच दिसती 
जणू काही ॥१०६

अवघे जगत 
हे परमात्म्यात 
शब्दही तयात 
असतात ॥१०७

तयाहून  इथे 
वेगळे न काही 
स्तुति  नि निंदाही 
वेगळी ना ॥१०८

ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती । मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ ९-५२ ॥ 

होताच समाप्ती 
निंदा आणि स्तुती 
दोन्ही ती जाती 
मौनातच ॥१०९

बोलणे जाहले 
किंवा न जाहले 
मौनाची ठाकले 
होऊनिया॥११०

घालिता अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होतु जाय । शिवा गेलियाही नोहे । केंही जाणें ॥ ९-५३ ॥ 

जातो ब्रह्मज्ञानी 
कुठल्याही पथी 
तयाते घडती 
शिव यात्रा ॥१११

जरी शिवालया 
गेला तो न गेला 
मुळ त्या स्थितीला 
चळेचिना ॥११२

चालणें आणि बैसक । दोन्ही मिळोनि एक । नोहे ऐसें कौतुक । इये ठायीं ॥ ९-५४ ॥ 

खरं तर असे 
चालणे बसणे 
दोन्हीही आनाने 
व्यक्ती ठाई ॥११३

परंतु कौतुक 
दिसे यया ठाई 
एकच ते होई 
जणू काही ॥११४

येर्हवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥ 

एरवी तरी तो 
जिथे जिथे पाहे 
तिथे तिथे आहे 
शिवरूप ॥११५

म्हणूनिया तया 
भलतिया स्थळा 
भलतिया वेळा 
दर्शन ते ॥११६

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...