Saturday 3 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१ते५(अभंग १ते ९) 💮💮💮💮💮💮


प्रकरण नववें जीवन्मुक्तदशाकथन (सुरवात)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१ते५(अभंग १ते ९) 
💮💮💮💮💮💮 

आतां आमोद सुनास जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले । आरिसे उठले । लोचनेसी ॥ ९-१ ॥ 

जसे काही इथे 
गंध नाक झाले 
शब्दास फुटले 
कान किंवा ॥१

अथवा आरसा 
जाहला पाहता 
होऊन या स्वतः 
डोळाची की॥२


आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें । कीं माथेचि चांफेपणें । बहकताती ॥ ९-२ ॥ 

वायु होऊनिया 
पंखा सुंदरसा 
आप आपणसा
वारा घेई ॥३

अथवा मस्तक 
फुल ते चाफ्याचे 
होऊन शोभेचे
नांदू लागेल॥४

जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे । चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ॥ ९-३ ॥ 

जर काय जिव्हा
रसरूप झाली 
कमळ फुलली 
सूर्य रूपे ॥५

आणिक चकोर 
स्वतः चंद्र झाले 
होते आतुरले 
चांदण्यास॥६

फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर । जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ॥ ९-४ ॥ 

सुंदर सुमने 
जाहली भ्रमर 
तरूणीच नर 
जर इथे ॥७

आणिक थकला 
निद्राळू थोरला 
स्वतः जाहला 
शेज जणू॥८

दिठीवियाचा रवा । नागरु इया ठेवा । घडिला कां कोरिवां । परी जैसा ॥ ९-५ ॥ 

सोन्याची लगड
ठेविली सुंदर 
होय अलंकार 
रेखीवसे ॥९

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...