Saturday 24 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार ओव्या २६ते ३१ (अभंग५७ ते ६९ ) ॥संपूर्ण संपन्न॥


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय १०वा ग्रंथपरिहार  ओव्या २६ते ३१ (अभंग५७ ते ६९) 
संपूर्ण
💮💮💮💮💮💮 
गंगावगाहना आली । पाणीयें गंगा झालीं । कां तिमिरें भेटलीं । सूर्या जैशीं ॥ १०-२६ ॥ 

ओहळ नद्यादी
गंगेशी भेटले 
पाणीच जाहले 
गंगेचे की ॥५७

किंवा अंधकार 
जाता भेटायला 
सूर्यची पै झाला 
आपोआप ॥५८

नाहीं परिसाची कसवटी । तंववरीच वानियाच्या गोठी । मग पंधरावयाच्या पटीं । बैसावें कीं ॥ १०-२७ ॥ 

कस तो पहावा 
तोवरी सोन्याचा 
जव परिसाचा 
स्पर्श नाही ॥५९

होताची तो स्पर्श 
अवघे पंधरे 
भेसळ न उरे 
तया माझी ॥६०

तैसें जे या अखरा । भेटती गाभारां । ते वोघ जैसे सागरा । आंतु आले ॥ १०-२८ ॥ 

तयापरी इया 
शिरूनी अक्षरा 
भेटती गाभारा 
अर्थाचिया  ॥६१

जैसे का हे ओघ 
मिळता सागरा 
तया न दुसरा 
आकार तो ॥६२

जैशा अकारादि अक्षरा । भेटती पन्नासही मात्रा । तैसें या चराचरा । दुसरें नाहीं ॥ १०-२९ ॥ 

अकार उकार 
आणिक मकार 
भेटता ओंकार 
प्रकटतो ॥६३

पन्नासही मात्रा 
भेटती ओंकारा 
आणिक आधारा
वाव नाही ॥६४

सारे चराचर 
भरुनी ओंकार 
आणिक या पर
काही नाही ॥६५

तैसी तये ईश्वरीं । अंगुळी नव्हेचि दुसरी । किंबहुना सरोभरीं शिवेसीचि ॥ १०-३० ॥ 

तैसा ईश्वरास 
अंगुली निर्देश 
वाव करण्यास 
मुळी नाही ॥६६

सारे त्रिभुवन 
असे तो व्यापून 
जाणा कणकण 
शिवरूप॥६७

म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें । सणु भोगिजे सणें विश्वाचेनि ॥ १०-३१ ॥ ॥ 

ज्ञानदेव म्हणे 
सार्‍या प्रेमभावे
अमृतानुभवे 
आनंद हा ॥६८

अवघ्या विश्वाने 
भोगावा आनंद 
होऊन आनंद 
रूपच ते ॥६९


इति श्रीसिद्धानुवाद अनुभवामृते ग्रंथपरिहारकथनं नाम दशमं प्रकरणं संपूर्णम् ॥

 🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

 

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...