Friday 9 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३१ते३५ (अभंग ६१ते ७१ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३१ते३५  (अभंग ६१ते ७१  ) 
💮💮💮💮💮💮

 घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ 

घरातल्या घरी 
चाले जर कुणी 
वाट ती होऊनी 
घर राहे ॥६१

आणि बसलासे 
घरात थकुनी
प्राप्तव्य होऊनी 
घर असे ॥६२

तैसें भलतें करितां । येथें पाविजे कांहीं आतां । ऐसें नाहीं न करितां । ठाकिजेना ॥ ९-३२ ॥

जीवनमुक्त तो
करे भलतेही 
तया प्राप्त काही 
करणे ना ॥६३

आणि जर त्याने 
केले नाही काही 
मिळवणे तेही 
राहिले ना॥६४


 आठवु आणि विसरु । तयातेंही घेऊं नेदी पसरु । दशेचा वेव्हारु । असाधारणु ॥ ९-३३ ॥ 

आत्मस्थितीची त्या 
त्याला आठवण 
किंवा विस्मरण 
होत नाही ॥६५

अशा विलक्षण 
असे तो स्थितीत 
दिसतो घटित 
व्यवहार ॥६६

झाला स्वेच्छाचि विधि । स्वैर झाला समाधि । दशे ये मोक्षऋद्धि । बैसों घापे ॥ ९-३४ ॥ 

तया जे इच्छित 
करावे वाटते 
तेच ते लिहते
विधि हाती ॥६७

आणिक वर्तन
तयाचे घडते 
समाधी तयाते
म्हणतसे ॥६८

मोक्षाचे ऐश्वर्य 
हे तया आसन
राहिला बसून 
त्यावरी तो ॥६९

झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु । होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥

ऐसी या स्थितीत 
घडून एकत्व 
देवची तो भक्त 
होय जणू ॥७०

मुक्कामाचे स्थान 
होय जणू पंथ 
आणिक एकांत 
विश्व सारे ॥७१

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...