Saturday 10 July 2021

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३६ते ४० (अभंग७२ ते ८२ )


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,३६ते ४० (अभंग७२  ते ८२  ) 
💮💮💮💮💮💮

भलतेउनि देवें । भलतेन भक्त होआवें । बैसला तेथें राणिवें । अकर्मु हा ॥ ९-३६ ॥ 

कुणी व्हावे देव 
कुणी व्हावे भक्त 
नाही बिघडत 
काम काही ॥७२

ऐसा हा भाग्याचा 
अकर्मू थोरला 
राणीवी बैसला 
जणू तेथे॥७३

देवाचिया दाटणी । देऊळा झाली आटणी । देशकाळादि वाहाणीं । येईच ना ॥ ९-३७ ॥ 

देव वाढुनिया 
सर्वव्यापी झाला 
काम ते देवळा 
नसे मग ॥७४

केवळ चैतन्य 
असे वस्तू पाही 
देश काळ नाही 
तया प्रति॥७५

देवीं देवोचि न माये / मा देवी कें अन्वयो आहे ? । येथ परिवारु बहूये । अघडता कीं ॥ ९-३८ ॥

देवात राहीना 
देवाचा विस्तार 
द्वैताला आधार 
कैसा मग ॥७६

तर मग देवी 
सर्व ही प्रकृती 
राहू का शकती
तयामध्ये ॥७७

अवघा मायेचा 
गमतो व्यापार 
आणि परिवार 
घडेची ना ॥७८

 ऐसियाहि स्वामीभृत्यसंबंधा । लागीं उठलीं श्रद्धा । तैं देवोचि नुसधा । कामविजे ॥ ९-३९ ॥

ऐसी या स्थितीत 
वाटे तया देवे 
आपण ची व्हावे 
स्वामी भृत्य॥७९

मग तो ची बने 
गुरु शिष्य देख 
नोकर मालक 
लीला येणे ॥८०

 अवघिया उपचारा । जपध्यान निर्धारा । नाहीं आन संसारा । देवोवांचुनी ॥ ९-४० ॥ 

मग तया नाही 
जप तप ध्यान 
उपचार आण 
उरलेला ॥८१

नुरतो संसार 
नुरतो निर्धार 
तुटतो व्यापार 
देवाविन ॥८२

🌾🌾🌾 .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...