नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे । हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ? ॥ १०-२१ ॥
जरी नित्य चंद्र
दिसतो सुंदर
पौर्णिमे अपार
शोभा त्याची ॥४७
असो सारी ठिक
जरी लोक दृष्टी
परी सूर्यदृष्टी
बोलू का हे ॥४८
प्रिया सावायिली होये । तै अंगीचे अंगीं न समाये । येर्हवीं तेथेंचि आहे । तारुण्य कीं ॥ १०-२२ ॥
अंगना अंगात
भरून राहते
तारुण्य सजते
ठायीची ते ॥४९
परी मिलनाला
प्रियाच्या सोबत
अंग न धरत
ओसंडते ॥५०
वसंताचा आला । फळीं फुलीं आपला । गगनाचिया डाळा । पेलती झाडें ॥ १०-२३ ॥
जैसा की वसंत
येताच बागेत
वृक्ष ये भरात
आपुलिया ॥५१
फळ व फुलांनी
भरुनिया जाती
आकाश चुंबती
जणू काय ॥५२
ययालागीं हें बोलणें । अनुभामृतपणें । स्वानुभूति परगुणें । वोगरिलें ॥ १०-२४ ॥
अमृतानुभव
विवरण ऐसे
अमृता सरीसे
आहे खरे ॥५३
स्वानुभवाचे हे
सुंदर पक्वान्ने
संतासि प्रेमाने
वाढियले ॥५४
आणि मुक्त मुमुक्षु बद्ध । हें तंववरी योग्यता भेद । अनुभामृतस्वाद । विरुद्ध जंव ॥ १०-२५ ॥
मुमुक्षु कोणी वा
असे मुक्त बद्ध
असती हे भेद
तोवरच ॥५५
जोवरी तयांनी
यया अमृताला
सुखानुभवाला
चाखिले ना ॥५६
🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵
No comments:
Post a Comment