कैसा मेळु आला गोडिये । जे दोघें न माती जगीं इये ।
कीं परमाणुहीमाजि उवायें । मांडलीं आहाती ॥११॥
ऐक्याची ही गोडी
वर्णा वी ती किती
दोघें न मावती
त्रिलोकीही ॥25॥
अणुरेणुलाही
राहती व्यापून
अवघे होऊन
आनंदात ॥26॥
जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंहि निर्माण ।
जियें दोघें जीवप्राण । जियां दोघां ॥१२॥
एकमेकाविना
तृणही निर्माण
करू शकती न
असे एक ॥ 27॥
जणू एकमेका
देऊन जीवित्व
धरती अस्तित्व
अनादी ही ॥28॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे ।
तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ॥१३॥
घरात मोटकी
दोघेच असती
जगत व्याप्ती
सर्व काही ॥29॥
पुरुष निजता
स्वामींनी जागते
संसार पाळते
सामर्थ्यांने ॥30॥
जयां दोघांमाजि येखादें । विपायें उमजलें होय निदें ।
रितें घरवात गिळूनि नुसधें । कांहीं ना करी ॥१४॥
होय कुणी जागे
दोघांमध्ये यया
संसार विलया
जातो असे ॥31॥
गिळून जगत
स्वरूप मागुती
केवळ उरते
अन्य नाही ॥32॥
दोहों अंगाची आटणी । गिंवसित आहाती येकपणीं ।
जाली भेदाचिया वाहाणी । आधाआधीं जियें ॥१५॥
दोघाही ययांची
होवून आटणी
स्वरूप मिळूनी
हरवती ॥33॥
तरीही भेदाच्या
जावून वाहिनी
अर्धाधी रूपांनी
मिरवती ॥34॥
No comments:
Post a Comment