अमृतानुभव पुढे चालू
जे स्वामिचिया सत्ता । वीण असों नेणें
पतिव्रता ।
जियेविण सर्व कर्ता । कांहींच ना जो
॥२१॥
पतीव्रते तिये
सदा स्वामीसत्ता
जाईना अन्यथा
कुठेही ती ॥४४ ॥
आणिक स्वामीला
तियेविन नाही
कर्तृत्व ते काही
इये जगी ॥४५ ॥
जे कीं भर्ताराचें दिसणें । भर्तार जियेचें असणें
।
नेणिजती दोघें जणें । निवडूं जियें ॥२२॥
शक्तीचे अस्तित्व
असे शिवावर
तिजला आधार
सर्वथा तो ॥ ४६॥
प्रकृती पुरुष
एक एकाधीन
करणे विभिन्न
शक्य नाही ॥४७ ॥
गोडी आणि गुळु । कापूर आणि परिमळु ।
निवडू जातां पांगूळु । निवाड होये ॥२३॥
गुळआणि गोडी
कापूर सुगंधा
वेगळे करता
येत नाही ॥४८ ॥
निवडणे तिथे
होते पूर्ण व्यर्थ
असे एकवट
दोघे जण ॥४९ ॥
समग्र दीप्ती घेतां । जेविं दीपचि ये हाता ।
तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवचि लाभे ॥२४॥
दीप्ती घेऊ जाता
दीप येतो हाता
ऐसी समग्रता
येथे असे ॥५० ॥
तैसे येथे शक्ती
शोधता तत्त्वता
शिव येई हाता
सवे तिच्या ॥५१ ॥
जैसा सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यचि गाभा ।
तेविं भेद गिळीत शोभा । एकीच जे ॥२५॥
सूर्य मिरवतो
प्रकाशाची आभा
प्रकाशात गाभा
सूर्याचाच ॥५२ ॥
सूर्य प्रकाशात
भेद नाही जैसा
शिवशक्ती तैसा
न्याय असे ॥ ५३॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
***
३१
No comments:
Post a Comment