Monday, 18 November 2019

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय २ सद्गुरू स्तवन ओव्या १ ते ५



सद्गुरू स्तवन १ ते ५ ओव्या



आतां उपायवनवसंतु । जो आज्ञेचा आहेवतंतु ।  
अमूर्तचि परि मूर्तु । कारुण्याचा ॥ २-१ ॥  


 साधन वनात
जणू की वसंत
येई बहरत
शिष्यासाठी

आज्ञेचा तो स्वामी
सौभाग्य होवूनी
येतसे जीवनी
बांधी गाठ

कारुण्याच्या भरी
अमूर्त ते रूप
होय मूर्तरूप
जगतात

अविद्येचे आडवे । भुंजीत जीवपणाचे भवे ।  
तया चैतन्याचे धांवे । कारुण्यें जो कीं ॥ २-२ ॥  

अविद्या काननी
भोगे जीवपण
भवरी गुंतून
भ्रमाच्या जो

तया चैतन्याचा
ऐकोनिया धावा
येई तया गावा
कारुण्याने 

मोडोनि मायाकुंजरु । मुक्तमोतियाचा वोगरु ।  
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदूं ॥ २-३ ॥  

मायारूपी हत्ती
मदाने उन्मत्त
तयाचे फोडत
गंडस्थळ

तयातून काढी
मुक्तीचे ते मोती
सोहम हंसा देती
आवडीने 

ऐसा कृपावंत
भरविता गुरू
निवृत्ती दातारू
वंदीयला 

जयाचेनि अपांगपातें । बंध मोक्षपणीं आते ।  
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ॥ २-४ ॥ 

जया दृष्टी भेदे
बंध होय मोक्ष
अशी असे साक्ष
ज्ञानीयाची 

जाता जयापासी
भेटते  जाणणे
जाणताच जीणे
कळो येई   १०

 कैवल्यकनकाचिया दाना । जो न कडसी थोर साना ।  
द्रष्ट्याचिया दर्शना । पाढाऊ जो ॥ २-५ ॥

चैतन्य कनक
जगी वाटतांना
म्हणती न साना
थोर कुणी   ११

जयाच्या कृपेने
द्रष्टा स्वरूपात  
जाय हरवत
आत्म प्रिय   १२


© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com
 **********************************


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...