Wednesday 16 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ४१ ते ४५ , (अभंग ८८ ते ९९)


अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ४१ ते ४५ , (अभंग ८८ ते ९९)   
*******
तरी अज्ञान स्वरूपें कैसें काय कार्यानुमेय असे
कीं प्रत्यक्षचि दिसे धांडोळूं आतां -४१
अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं कीजे जयाची घेणी  
ते अज्ञानाची करणी अज्ञान नव्हे -४२  
जैसी अंकुरेंसी सरळ वेली दिसे वेल्हाळ  
तें बीज नव्हे केवळ बीजकार्य होय -४३  
कां शुभाशुभ रूपें स्वप्नदृष्टी आरोपें  
तें नीद नव्हे जाउपें निदेचें कीं -४४  
नाना चांदु एक असे तो व्योमीं दुजा दिसे  
तें तिमिरकार्य जैसें तिमिर नव्हे -४५

४१
 तर मग काय 
कार्य अज्ञानाचे 
अनुमान त्याचे 
कैसे होय ॥८८॥

तयाला पाहून 
येते  का कळून 
आले ते कुठून 
जगात या  ॥८९॥

किंवा असे हे ची 
प्रत्यक्षचि सिध्द 
याचा घेऊ शोध 
आपण  रे ॥९०॥

४२
अहो प्रत्यक्षातही 
इथल्या प्रमाणी
घेणे जे जाणूनी  
यत्नानी जे ॥९१॥

परी असो हे तो 
अज्ञान करणी 
अज्ञान कुठूनी 
येई त्यात  ?॥९२॥
४३
रुजते अंकुर 
वाहते सरळ 
वेल ती वेल्हाळ 
मग दिसे ॥९३॥

वेल नसे बीज
बीजाचे ते कार्य
जाणावे उभय 
वेगळाले ॥९४॥
४४
निजता स्वप्नात 
शुभाशुभ दिसे 
काय तिची असे 
निद्रा स्वये  ॥९५॥

मैत्रीचीये पोटी 
उपजते सृष्टी 
निद्रा बाळक ती
जणू काही ॥९६॥
४५
पाहता नभात
चंद्र एक असे  
परी दोन दिसे 
कधी कुणा ॥९७॥

डोळ्यात तिमिर
आजार पडता
तयाची कार्यता 
अैसी दिसे ॥९८॥

परी हे  तो काज 
असे तिमीराचे 
रूप तिमीराचे 
नसे तिथे  ॥९९ 
******
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे  

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...