Thursday 17 December 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ४६ ते ५० , (अभंग १०० ते ११३)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या ,  ४६ ते ५० , (अभंग १०० ते ११३)   

तैसें प्रमाता प्रमेय प्रमाण जें त्रय  
तें अज्ञानाचें कार्य अज्ञान नव्हे -४६  
म्हणोनि प्रत्यक्षादिकीं अज्ञान कार्यविशेखीं  
नेघे तें असेये विखीं आनु नाहीं -४७  
अज्ञान कार्यपणें घेइजे तें अज्ञान म्हणे  
तरी घेतांहि करणें तयाचेंची -४८  
स्वप्नीं दिसे तें स्वप्न मा देखता काय आन  
तैसें कार्यचि अज्ञान केवळ जरी -४९  
तरी चाखिला गुळ गुळें माखिलें काजळ काजळें
 कां घेपे देपे शुळें । हालया सुळु ॥ ७-५० ॥

४६

तयापरी येथे
पाहता प्रमेय 
प्रमाणही सत्य
दिसे जरी ॥१००॥

त्याचे  उपादान
असते अज्ञान 
जरी ते अज्ञान 
स्वयं नसे ॥१०१॥

(पाहता प्रमाण 
प्रमेय पाहणे 
प्रमाणा ते होणे  
सहायक )॥१०२॥
४७
प्रत्यक्ष इत्यादी 
सहाही प्रमाणे 
अज्ञान तयाने 
उपजते ॥१०३॥
( शास्त्रात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती व अनुपलब्धी अशी सहा प्रमाणे मानली आहेत.)

अज्ञान अस्तित्व 
घडतो स्वीकार  
त्याच्या  कार्यावर 
विशेषचि॥१०४॥
 
तया शिवाय रे 
नच गत्यंतर 
करणे स्वीकार 
भाग असे  ॥१०५॥

४८
अज्ञानाचे कार्य
म्हणजे अज्ञान 
सिध्द हे म्हणून 
एका पक्षी ॥१०६॥

तर ऐसे दिसे 
प्रमाणा  वरून 
सिध्द ते अज्ञान 
होय येथे ॥१०७

अहो तेही तर 
अज्ञानाची असे 
मग पुढे कसे 
जावे  तरी॥१०८॥
४९
स्वप्नी दिसते ते 
जर असे स्वप्न 
पाहतो तो आन 
काय असे ॥१०९॥

तया परी इथे 
कार्य अज्ञानाचे   
अज्ञानच साचे
मानावे बा ॥११०॥

गुळाने गुळाची 
चव जर घेतली 
काजळी लावली 
काजळाला ॥१११॥

सुळाने सुळाला 
देणे सुळावर 
सुळाचा वापर 
करूनिया ॥११२॥

जर येथे घडे
अैसी हि करणी 
तर ती कथनी
सार्थ म्हणू ॥११३॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने  

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...