Sunday, 22 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २१ ते २५ (अभंग ४१ ते५० )



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४   ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २१  ते  २५   (अभंग ४१ ते५० )
 -------------------------------------------------------------------------------------------------------------


सूर्य सूर्यासि विवळे ?। कां फळ आपणया फळे ?
परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥
 
२१
सूर्य प्रकाशित 
करे का सूर्याला   
फळा फळाला  
येत असे 

सुगंध सुगंध 
घेई उपभोग 
ऐसा विनियोग 
झाला आहे


तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।
म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥
२२
तसेच आपण 
न जाणे आपणा 
जाणण्याच्या खुणा 
सापडेना ४३

ज्ञातेपणा विन 
द्वैताला सांडून 
असते होऊन 
ज्ञान मात्र ४४


आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।
तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥
 २३
ज्ञानाला ज्ञानाने 
म्हणते जे ज्ञान 
काय ते अज्ञान 
नाही काय

अज्ञाना पर्यायी 
असे जे हे ज्ञान 
तयात अज्ञान 
अंतर्भूत ४६

जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।
मा तेज जही होये । तेजासी का‍ईं ? ॥ ४-२४ ॥
 
बघा तेज जैसे 
असे जे जे काही 
अंधारात ते नाही 
खरोखर


परी तया तेजा 
हेच तेज असे 
म्हणावे ते कसे 
सांगा बरे


तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।
आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥ २५
जर का असणे 
आणिक नसणे 
नाही जया होणे 
कधीकाळी

तर मग सारे 
नाही काय मिथ्या
अवघी ही वाया 
वार्ता कुणा ५०

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...