अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ६ रे १० (अभंग ११ते २० )
*********************************************
६
अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका ।
फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ ४-६ ॥
अज्ञान आधार
नसताना ज्ञान
अपार होऊन
फाकतसे ॥११ ॥
अज्ञाना अभावी
ज्ञान ते कुठले
नुरते एकले
मग तेही ॥१२ ॥
७
दशाही ते निमालिया । येणें जें उवाया ।
तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ ४-७ ॥
सरू येता वात
मोठी होते ज्योत
दृष्टीस ये ॥१३ ॥
तिचे ते वाढणे
असते संपणे
जणू नाश होणे
आपुलाची॥१४ ॥
८
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणे ।
फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ४-८ ॥
स्तनाचे उठणे
आणिक पडणे
क्षणात घडणे
होय जैसे ॥१५ ॥
तैसेची जाईच्या
फुलाचे फुलणे
घडे कोमेजणे
याचक्षणी ॥१६ ॥
९
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।
कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ ४-९ ॥
आणिक निमणे
असते घडणे
सवेचिच ॥१७ ॥
विजेचे नभात
जे लखलखणे
अस्तंगत होणे
तेचि असे ॥१८ ॥
१०
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरि वाढे ज्ञान ।
जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ ४-१० ॥जोवरी घेतसे
अज्ञाना प्राशून
तोवरीच ज्ञान
वाढतसे॥१९ ॥
आणि सरताच
समुळ अज्ञान
जातसे नाशून
तयासवे ॥२० ॥
© डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment