अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ६६ ते ७० (॥ १५५ ॥)
**************************************************************
पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला ।
परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥
६६
जैसा अरण्यात
निघालेला कुणी
बसतो उठून
आपण चि ॥ १४६॥
तोच तो असतो
जागाही होणारा
जागा करणारा
एकमेव ॥ १४७॥
जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी ।
गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥
६७
जैसा जो उठवी
अन् उठणारा
नसतो वेगळा
काही केल्या॥ १४८॥
तैसाची सांगतो
आणिक ऐकतो
तोची तो असतो
गुरुदेव ॥ १४९॥
दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।
भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥
६८
दर्पणा वाचून
आपुलाच डोळा
स्वत:ला भेटला
जर कधी ॥ १५०॥
तरीच ही लीला
सांगतो तुम्हाला
काही कळायला
शक्य होई ॥ १५१॥
एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्यासी विसकुसों ।
सोईरिकीचा अतिसो । पोखितसे ॥ २-६९ ॥
६९
घडल्या वाचुनी
द्वैताची उत्पत्ती
ऐक्याची निवृत्ती
काही एक ॥ १५२॥
तेथे धडे थेट
ऐसी सोयरिक
उभय पोषक
एक एका ॥ १५३॥
निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।
जया निवृत्तीची राणीव । निवृत्तिचि ॥ २-७० ॥
७०
नाव निवृत्ती हे
जया मनोहर
निवृतीच सुंदर
शोभा ज्याची ॥ १५४॥
निवृत्तीच्या पदा
राजश्री बसती
नाव हे निवृति
घेवुनिया ॥ १५५॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
No comments:
Post a Comment