Thursday, 9 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ५१ ते ५५






 अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या  ५१ ते  ५५
 *******************************************************************
गुणा तेलाचिया सोयरिका । निर्वाहिली दीपकळिका ।
ते का होईल पुळिका । कापुराचिया ॥ २-५१ ॥

५१
तेल नि वातीची
होता सोयरिक
पेटतो दिपक
मंदपणे ॥११५

परि पेटविता
वडी कापुराची
ज्योत प्रकाशाची
जैसी आन ॥११६

५२
तया दोहों परस्परें । होय ना जंव मेळहैरें ।
तंव दोहीचेंही सरे । सरिसेंचि ॥ २-५२ ॥


तेथे त्या दोघांचे
होताच मिलन
जाती हरवून
एक सवे ॥११७

सरता कापूर
अग्नी तो ही सरे
अशी एकसरे
एक होती॥११८

५३
तेविं देखेना कायी ययातें । तंव गेलें वंद्य वंदितें ।
चेइलिया कांतें । स्वप्नींचें जेवीं ॥ २-५३ ॥

तया परी तेथे
पाहण्यास जाता
वंद्य मी वंदिता
दिसेनाचि ॥११९

स्वप्नातील कांता
भेटेना शोधता
निद्रिस्त उठता
झोपेतून ॥१२०

५४
किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथें उपखा ।
फेडोनियां स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥ २-५४ ॥

अवघे हे बोल
घडती द्वैतात
केवळ निरर्थ
गुरू पुढे ॥१२१

गुरु आत्म सखा
जाहलो वंदिता
भेदाची ती कथा
सांडूनिया ॥१२२

 
याच्या सख्याची नवाई । आंगीं एकपण रूप नाहीं ।
आणि गुरु-शिष्य दुबाळीही । पवाडु केला ॥ २-५५

काय सांगू बाई
सख्य नवलाई
एकरूप नाही
जरी अंगी ॥१२३

गुरू शिष्य ऐसी
द्वैताची ही किर्ती
जगी मिरविती
परि साच ॥१२४



©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...