Friday, 31 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७१ ते ७५(१६६ अभंग)

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७१ ते   ७५

 

वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें ।  
आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ २-७१ ॥  

७१
प्रवृत्ती विरोध
केलिया वाचून
निवृत्ती आणून
बोधामध्ये  १५६

तैसा नव्हे हाची
केवळ निवृत्ती
वृती कृति स्थिती
अवघीच १५७

आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति । 
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ २-७२ ॥  

७२
आम्ही देई मित्र
मावळून राती
दिवसा उन्नती
उगवून १५८

पाहून प्रवृत्ती
संसाराचे वारे
थोपविले सारे
निवृत्तीने १५९

ऐसे नव्हे काही
करणे सायास
निवृत्ती तयास 
स्वयंपूर्ण १६०

वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ ।  
तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ २-७३ ॥  

७३

कोंदनाच्या लेपी
रत्न चकाकते
उठून दिसते
आणिक ही १६१

तैसा नव्हे हा गा
चमके स्व तेजे
चक्रवर्ती राजे
अध्यात्माचे १६२

गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ।  
तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ २-७४ ॥  

७४
घेई वेटाळून
आकाश अवघे
चंद्र पुरून दशे
आल्यावरी १६३

दिसे शोभिवंत
तोही त्यानेच
सत्त्व चांदण्याची
लेवूनिया १६४

तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।  
घेयावया फुलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ २-७५ ॥
 

७५ 
तया परि स्थिती
होवून निवृती
मग्न आपल्याती
दिसती हे १६५

जैसा परिमळ
भोग घेऊ जाता
सुमनची स्वतः
घ्राण व्हावे १६६



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...