Wednesday, 15 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ५६ ते ६० ..(॥१३५॥)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या  ५६ ते ६०
*******************************************************************

कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण ।
हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥

५६
शिवल्या वाचून
परंतु द्वैताला
गुरू शिष्या खेळा
मांडियेले   १२५

आहे नाही सोस
नच दोन भाव
ऐसा हा स्वभाव
विलक्षण  १२६

जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये ।
तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥

 57

होवून अफाट
जग घेई पोटी
गणना एवढी
व्याप्ती ज्याची १२७

परि तोची असे
नाही निशे मध्ये
नसणे अवघे
पांघरून१२८

कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु ।
तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥

५८
पूर्ण अपूर्णता
जैसी सिंधू पोटी
भरती ओहोटी
होऊनिया१२९

तैसे तया ठायी
विरुद्ध पाहुणे
असणे नसणे
दिसू येते१३०

तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥


५९

तेज आणि तम
यांचे नाही नाते
एक नाही तिथे
दुजे असे१३१

सूर्य नच जाणे
तोही भेदभाव
संपूर्ण अभाव
प्रकाशाची१३२

येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ?
विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥

६०
एक म्हणताच 
भेद जन्मा येतो 
एक पणा होतो 
व्यर्थ तिथे १३३

म्हणून गुरूला 
एक विशेषण 
निरर्थ दिसून 
येत असे १३४

आपणा वेगळे 
कैसे हो आपण 
अवघे बोलणं 
अर्थशून्य१३५





© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com/


No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...