अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ४६ ते ५०
********************************************************************
आकाशाचाआरिसा । नुठे प्रतिबिंबाचा ठसा ।
हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारासी ॥ २-४६ ॥
काय कधी होय
नभाचा आरसा
प्रतिबिंब ठसा
उमटे त्या ॥१०४ ॥
तैसा सद्गुरू
नच एकदेशी
नमस्काराशी
भेटण्याला॥१०५ ॥
परी नव्हे तरी नव्हो । हें वेखासें कां घेवो ।
परी वंदीतयाहि ठावो । उरों नेदी ॥ २-४७ ॥
नाही तर नाही
सद्गुरू काही
स्वीकारत नाही
वंद्यत्व ते ॥१०६ ॥
कासया मी घेई
उफराटा अर्थ
सद्गुरुनाथ
नमितांना ॥१०७ ॥
आंगौनि येकुणा झोळु । फेडितांचि तो तरी बाहिरिळू ।
कडु फिटे आंतुलु । न फेडितांचि ॥ २-४८ ॥
परी नवलाई
येथे घडे ऐसी
वंदीताही जाई
वंदनेसह॥१०८ ॥
बाहेरून झोळ
सोडता वस्त्राचा
आतलाही त्यांचा
सुटे जैसा॥१०९ ॥
त्यास वेगळे
फेडणे न पडे
आपोआप घडते
तेही जैसे ॥११० ॥
नाना बिंबपणासरिसें । घेऊनि प्रतिबिंब नासे ।
नेलें वंद्यत्व येणें तैसें । वंदितेंनसीं ॥ २-४९ ॥
प्रतिबिंबा नाशी
जाय बिंब पणा
घेऊन दर्पण
होते काही ॥१११ ॥
तैसा तो नमिता
नुरे ची तत्त्वता
गुरुशी वंदता
पूर्णपणे ॥११२ ॥
नाहीं रूपाचि जेथें सोये । तेथें दृष्टीचें कांहींचि नव्हे ।
आम्हां फळले हे पाये । ऐसिया दशा ॥ २-५० ॥
जेथे नाही रूप
कुठला आकार
दृष्टीचा प्रकार
व्यर्थ तेथे॥११३ ॥
आम्हाते कळले
भाग्याची उदेले
जेधवा भेटले
गुरुपाद॥११४ ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/
No comments:
Post a Comment