Friday, 31 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७१ ते ७५(१६६ अभंग)

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ७१ ते   ७५

 

वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेंनि बोधें ।  
आणिजे तैसा वादें । निवृत्ति नव्हे ॥ २-७१ ॥  

७१
प्रवृत्ती विरोध
केलिया वाचून
निवृत्ती आणून
बोधामध्ये  १५६

तैसा नव्हे हाची
केवळ निवृत्ती
वृती कृति स्थिती
अवघीच १५७

आपणा देऊनि राती । दिवसा आणी उन्नति । 
प्रवृत्ति वारी निवृत्ति । नव्हे तैसा ॥ २-७२ ॥  

७२
आम्ही देई मित्र
मावळून राती
दिवसा उन्नती
उगवून १५८

पाहून प्रवृत्ती
संसाराचे वारे
थोपविले सारे
निवृत्तीने १५९

ऐसे नव्हे काही
करणे सायास
निवृत्ती तयास 
स्वयंपूर्ण १६०

वोपसरयाचें बळ । घेउनि मिरवे कीळ ।  
तैसें रत्न नव्हे निखळ । चक्रवर्ती हा ॥ २-७३ ॥  

७३

कोंदनाच्या लेपी
रत्न चकाकते
उठून दिसते
आणिक ही १६१

तैसा नव्हे हा गा
चमके स्व तेजे
चक्रवर्ती राजे
अध्यात्माचे १६२

गगनही सूनि पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ।  
तैं चांदिणें तेणेंसि उठी । आंग जयाचें ॥ २-७४ ॥  

७४
घेई वेटाळून
आकाश अवघे
चंद्र पुरून दशे
आल्यावरी १६३

दिसे शोभिवंत
तोही त्यानेच
सत्त्व चांदण्याची
लेवूनिया १६४

तैसें निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ।  
घेयावया फुलचि झालें घ्राण । आपुली दृती ॥ २-७५ ॥
 

७५ 
तया परि स्थिती
होवून निवृती
मग्न आपल्याती
दिसती हे १६५

जैसा परिमळ
भोग घेऊ जाता
सुमनची स्वतः
घ्राण व्हावे १६६



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com/

Sunday, 26 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ६६ ते ७० (॥ १५५ ॥)

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ६६ ते ७०   (॥ १५५ ॥)
**************************************************************

पहापा निरंजनीं निदेला । तो हा निर्विवाद येकला । 
 परि चेता चेवविता जाहला । दोन्ही तोचि ॥ २-६६ ॥

६६

जैसा अरण्यात
निघालेला कुणी
बसतो उठून
आपण चि ॥ १४६॥ 

तोच तो असतो
जागाही होणारा
जागा करणारा
एकमेव ॥ १४७॥ 

 जे तोचि चेता तोचि चेववी । तेवीं हाचि बुझे हाचि बुझावी । 
 गुरुशिष्यत्व नांदवी । ऐसेन हा ॥ २-६७ ॥ 

 ६७

जैसा जो उठवी
अन् उठणारा
नसतो वेगळा
काही केल्या॥ १४८॥ 

तैसाची सांगतो
आणिक ऐकतो
तोची तो असतो
गुरुदेव ॥ १४९॥ 

दर्पणेवीण डोळा । आपुले भेटीचा सोहळा ।  
भोगितो तरि लीळा । सांगतों हें ॥ २-६८ ॥ 

६८

दर्पणा वाचून
आपुलाच डोळा
स्वत:ला भेटला
जर कधी  ॥ १५०॥ 

तरीच ही लीला
सांगतो तुम्हाला
काही कळायला
शक्य होई  ॥ १५१॥ 

एवं द्वैतासी उमसो । नेदि ऐक्यासी विसकुसों ।  
सोईरिकीचा अतिसो । पोखितसे ॥ २-६९ ॥
 
६९
घडल्या वाचुनी
द्वैताची उत्पत्ती
ऐक्याची निवृत्ती
काही एक  ॥ १५२॥ 

तेथे धडे थेट
ऐसी सोयरिक
उभय पोषक
एक एका ॥ १५३॥ 

 निवृत्ति जया नांव । निवृत्ति जया बरव ।  
जया निवृत्तीची राणीव । निवृत्तिचि ॥ २-७० ॥
७०

नाव निवृत्ती हे
जया मनोहर
निवृतीच सुंदर
शोभा ज्याची ॥ १५४॥ 

निवृत्तीच्या पदा
राजश्री बसती 
नाव हे निवृति
घेवुनिया  ॥ १५५॥ 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com/

Friday, 17 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ६१ ते ६५ (॥ १४५॥)






अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या  ६१   ते ६५
*******************************************************************


म्हणौनि शिष्य आणि गुरुनाथु । या दोहों शब्दांचा अर्थु । 
श्रीगुरुचि परी होतु । दोहों ठायीं ॥ २-६१ ॥  
 
६१

म्हणोनिया शिष्य
आणि गुरुनाथ
दोघांचाही अर्थ
गुरुनाथ  ॥ १३६ ॥ 


जरी का भिन्नशी
जगाला दिसती
गुरूची असती
दोन्ही ठायी ॥ १३७ ॥ 

कां सुवर्ण आणि लेणें । वसतें येकें सुवर्णें ।  
वसतें चंद्र चांदणें । चंद्रींचि जेवीं ॥ २-६२ ॥  

६२

सुवर्ण लेण्यात
केवळ सुवर्ण
असते भरून
ओत प्रोत ॥ १३८ ॥ 

किंवा चांदण्यात
चंद्रमा केवळ
भरला सुंदर
दिसतोच   ॥ १३९ ॥ 


नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । 
 गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥  
 ६३

जैसा की कापूर
अन् परिमळ
कापूर केवळ
असे देखा   ॥ १४० ॥ 

गुणांची जी गोडी
गुळची साचार
चवीस आकार
अन्य नाही ॥ १४१ ॥ 


इतैसा गुरुशिष्यमिसें । हाचि येकु उल्हासे ।  
जर्ही कांहीं दिसे । दोन्ही-पणें ॥ २-६४ ॥  
 ६४

ऐशिया परी हा
गुरू शिष्यमिशे
गुरूची विलासे
जगामाजी  ॥ १४२  ॥ 

जरि दोन दिसे
भिन्न  ऐसे भासे
एकत्वी उल्हासे
नटलेले    ॥ १४३  ॥ 

आरिसा आणि मुखीं । मी दिसे हे उखी ।  
आपुलिये ओळखी । जाणे मुख ॥ २-६५ ॥
 ६५

आरशात मुख
आपले पाहून
घेतले जाणून
असा की मी  ॥ १४४  ॥ 

जरी प्रतिबिंब
असतो आभास
आप आपणास
कळो येई   ॥ १४५॥ 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com/

Wednesday, 15 January 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या ५६ ते ६० ..(॥१३५॥)




अमृतानुभव, पद्य भावानुवाद अध्याय २, सद्गुरू स्तवन, ओव्या  ५६ ते ६०
*******************************************************************

कैसा आपणया आपण । दोंविण सोइरेपण ।
हा यहूनि विलक्षण । नाहींना नोहे ॥ २-५६ ॥

५६
शिवल्या वाचून
परंतु द्वैताला
गुरू शिष्या खेळा
मांडियेले   १२५

आहे नाही सोस
नच दोन भाव
ऐसा हा स्वभाव
विलक्षण  १२६

जग आघवें पोटीं माये । गगनायेव्हढे होऊनि ठाये ।
तेचि निशी साहे । नाहींपणाची ॥ २-५७ ॥

 57

होवून अफाट
जग घेई पोटी
गणना एवढी
व्याप्ती ज्याची १२७

परि तोची असे
नाही निशे मध्ये
नसणे अवघे
पांघरून१२८

कां पूर्णते तरि आधारु । सिंधु जैसा दुर्भरु ।
तैसा विरुद्धेयां पाहुणेरु । याच्या घरीं ॥ २-५८ ॥

५८
पूर्ण अपूर्णता
जैसी सिंधू पोटी
भरती ओहोटी
होऊनिया१२९

तैसे तया ठायी
विरुद्ध पाहुणे
असणे नसणे
दिसू येते१३०

तेजा तमातें कांहीं । परस्परें निकें नाहीं ।
परि सूर्याच्या ठायीं । सूर्यचि असे ॥ २-५९ ॥


५९

तेज आणि तम
यांचे नाही नाते
एक नाही तिथे
दुजे असे१३१

सूर्य नच जाणे
तोही भेदभाव
संपूर्ण अभाव
प्रकाशाची१३२

येक म्हणतां भेदें । तें कीं नानात्वें नांदे ?
विरुद्धें आपणया विरुद्धें । होती काइ ? ॥ २-६० ॥

६०
एक म्हणताच 
भेद जन्मा येतो 
एक पणा होतो 
व्यर्थ तिथे १३३

म्हणून गुरूला 
एक विशेषण 
निरर्थ दिसून 
येत असे १३४

आपणा वेगळे 
कैसे हो आपण 
अवघे बोलणं 
अर्थशून्य१३५





© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com/


अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...