Tuesday 25 February 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या २६ ते ३०



अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ३, वाचा ऋण परिहार ओव्या २६ ते ३०


आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु ।

करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥
 
अंगा कंटाळले
इंधन  शिणले
ज्ञानाग्नी शिरले
उठूनिया ५५
सारे जरी नाशे
बोध परि राहे
भस्माच्या वैसे
उरोनिया ५६

जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।
परि हो‍ऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥
 
जळी मिसळता 
दिसे न वेगळा
रूप कापूराला
असेचिना५७

जरी गंध रुपी
भरुनी राहिला
घ्राणास कळला
सुगंधाने५८



अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती ।
परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥
जैसे अंगालागी
लावता विभूती
कण ते उडती
वारियाने ५९॥ 

पांघरून त्वचा
परी मिरवीते
शुभ्र विभूतिते
देहा वरी  ६०


ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे ।
तहीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥

ओहळाचे पाणी
जाताच सरून
न च ये दिसून
ओहळ तो ६१

परि ओल काही
उरलीसुरली
दावती ओहोळी
अस्तित्वाला६२


ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।
असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥
 भर मध्यानिचे
तळपता ऊन
सावली ची खुण
दिसू नये६३

परी असते ती
बघा पायतळी
जणू लपलेली
तया काळी६४


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 https://amrutaanubhav.blogspot.com/

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...