Thursday 20 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या ११ते १५(अभंग २१ते ३०)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या ६ते १०(अभंग ११ते २०)
*********
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे । गोमटे काय शब्दाचें । येकैक वानूं ॥ ६-११ ॥ 

होतो सहाय्यक 
आत्मविद्येसाठी 
स्वतःच शेवटी 
संपुनिया ॥२१॥
ऐसिया शब्दाचे 
किती गुण गावे 
साधका स्वभावे 
आप्तमित्र ॥२२॥

किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । 
परी ययाही संबंधु । नाहीं येथें ॥ ६-१२ ॥ 

असे शब्द जरी 
हा स्मरण दानी
प्रसिद्ध म्हणुनि 
जगतात ॥२३
परी आत्मरुपी 
तया नच वाव 
नच शिरकाव 
घडे कधी॥२४

आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे । स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ ६-१३ ॥ 

आत्मया विषयी 
बोलावे ते कुणी 
बोलणे वाहुनी 
व्यर्थ जाते ॥२५॥
आत्मा स्वसंवेद्य 
आहे रे प्रसिद्ध 
शब्द उपयोग 
नाही तिथे ॥२६

आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे । तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥ ६-१४ ॥ 

आठवावे कुणी 
विसरावे कुणी 
विषय होऊनी 
राहावे वा ॥२७॥
 अवघे सायास 
होती दुजेपणी 
आत्मा एकत्वानी 
नांदे इथे ॥२८॥

आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? । 
काय जीभ जिभितें । चाखे न चाखे ? ॥ ६-१५ ॥ 

आपले आपणा 
होते का स्मरण 
किंवा विस्मरण 
कधीकाळी ॥२९॥
जैसे की बोलणे 
जीभ जीभ चाखे 
अथवा न चाखे 
व्यर्थ इथे ॥३०॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
**********

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...