Friday, 28 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ३१ते ३५(अभंग ६४ते ७४) ***********

७ वा भाग 
दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें । तेविं अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ ६-३१ ॥ 

जरी का जागृती 
आल्याचे कळते 
स्वप्न खोटे होते 
पडलेले ॥६४ ॥
आणि ते खोटेच 
होते रे सर्वथा 
त्यास जो भोगता 
होता तेव्हा ॥६५॥
अविद्या नसते
जरी हे कळते 
परि ती नसते 
कदा काळी॥६६॥

वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया । नागवें नागविलिया । विशेषु काई ॥ ६-३२ ॥

गारुड्याची लेणी 
जरी घरी कोणी 
ठेवली भरुनी 
तरी व्यर्थ ॥६७॥
 नागव्यास कोणी 
जरी का लुटले 
तरी ते लुटले 
म्हणावे का ॥६८॥

 मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ । परि उपवासावेगळ । आनु आथी ? ॥ ६-३३ ॥

कल्पनेत अन्न 
चाखली पक्वांने
 लाखदा भोजने 
केली जरी ॥६९॥
 उपवासा वीणा 
तया नाही फळ
मनाचा तो खेळ 
व्यर्थ जणू ॥७०॥

 मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें । माउमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ ६-३४ ॥

जेथे मृगजळ 
नसे ती जमीन 
ओलाव्या वाचून 
असे जरी ॥७१॥
आणि मृगजळ 
भासे ती जमीन 
पाण्याने भरून 
असे काय॥७२॥

 हें दिसे तैसें असे । तरी चित्रीचेनि पाउसें । वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ ६-३५ ॥ 
चित्रीचा पाऊस 
चित्री घनदाट 
परी प्रत्यक्षात 
थेंब नाही ॥७३
तयाने भिजतो
न माणूस प्राणी 
जाती न भरूनी
तळी मळी॥७४॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...