Thursday, 27 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २६ते ३०(अभंग ५१ते ६३) ***********

भाग६ 
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २६ते ३०(अभंग ५१ते ६३) ***********

अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका । तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ ६-२६ ॥ 

पुराण प्रसिद्ध 
कथा अगस्तीची 
सिंधू प्राशनाची 
एका घोटी ॥५१॥
जर का ऋषी है 
मृगजळ घोट 
घेवुनिया तृप्त 
होती कधी ॥५२॥
तरीच म्हणावे 
हे अविद्या नाश
शब्दास तर्कास 
शक्य असे॥५३॥

साहे बोलाची बळघी । ऐसी अविद्या असे जगीं । तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ ६-२७ ॥ 
बोलायची चढाई  
साहे जी जगता  
काय ती अविद्या 
असे जगी ॥५४॥
असे तर मग 
गंधर्व नगरे 
अग्नीच्या आहारे 
जाऊ शके ॥५५॥

नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे । तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ ६-२८ ॥ 

दिव्याची संगत 
साहे ना अंधार 
येईना समोर 
तयाचिया ॥५६॥
ऐसे काही घडे 
सांगा पाहू इथे 
प्रकाश तमाते 
नाशेनाचि ॥५७॥

प्रकाश असणे
 तै तम नसणे 
अवघे घडणे 
ऐसेचि हे ॥५८॥ 

नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु । तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ ६-२९ ॥ 

दिवस पाहण्या 
दिवाची लावावा
व्यर्थचि शिणावा 
जैसा कोणी ॥५९॥
तयापरी गमे
सारी उठाठेव 
शब्दी आत्मदेव 
देखावया॥६०॥

जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें । मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ ६-३० ॥

जिथे न पडते 
कधी ती सावली 
तिथे ती सावली 
नसतेचि ॥६१॥
आणि जिथे जरी 
गमते सावली 
तिथे हि सावली 
नसतेच ॥६२॥
अडली किरणे  
तिथे ती सूर्याची 
कथा अभावाची 
सांगताती॥६३॥
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
********

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...