५ वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या २१ते २५(अभंग४१ते ५०) ***********
सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील । हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ ६-२१ ॥
रात्रीला नाशून
सूर्य हा येईल
व्यर्थ हे की बोल
जैसे की ॥४१॥
सत्याच्या प्रांतात
ठरतात खोटे
आणिक ओखटे
तैसे काही॥४२॥
चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? । कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ ६-२२ ॥
काय जागा झाला
निद्रेवरी रुसे
ऐसी वस्तू असे
निद्रा काही ॥४३॥
काय जागृताला
पुन्हा जागवणे
ऐसे जागवणे
असे काय॥४४॥
म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती । नाहीं आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥ ६-२३ ॥
म्हणुनी अविद्या
नाहीच नुरुती
जी की नाशासाठी
उपलब्ध ॥४५॥
आणि आत्मा शब्दे
येई आत्मस्थिती
ऐसी काही स्थिती
नसे इथे॥४६॥
अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें । मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ ६-२४ ॥
अविद्या म्हणजे
वांझेचेच पोर
गमे खरोखर
नसलेले ॥४७॥
तर्काच्या खुरपी
नसलेले तण
काढू जाई कोण
तैसे ची हे ॥४८॥
इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें । तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ ६-२५ ॥
नभास दिसते
इंद्राचे धनुष्य
कुणी का तयास
बाण लावी ॥४९॥
रंगाचा आभास
दिसे परी खास
नसून कशास
थांगपत्ता ॥५०॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://amrutanubhav.com
No comments:
Post a Comment