८वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ३६ते ४०(अभंग ७५ते ८४) ***********
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें । तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥ ६-३६ ॥
जरी का अंधार
कालवून शाई
उपयोगा जाई
आणली ती ॥७५॥
शाई करण्याचा
कार्या का लागावे
व्यर्थ का शिणावे
मग कोणी ॥७६॥
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? । तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ ६-३७ ॥
आकाश हे निळे
पाहती ते डोळे
पण ते वेगळे
तयाहून ॥७७॥
तशीच अविद्या
भासमान खरी
जाणुनिया परी
घ्यावी तुम्ही ॥७८॥
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ ६-३८ ॥
स्व नामी सांगते
जी नाही आहे ते
मुद्रा "अ" काराते
मिरवून ॥७९॥
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण । आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥ ६-३९ ॥
कैसे आहे हिचे
निर्वाचक पण
आहे नाही पण
बोलो न ये ॥८० ॥
घेऊनी शपथ
सांगे नाही पण
तेही खुळे पण
खरे तर ॥८१॥
का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? । वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ ६-४० ॥
जरी अविद्या ही
मानलीच खरी
परी विवेका वरी
टिकेना ती ॥८२॥
घटाचे अभावे
असतेच भूमी
किंवा म्हणो कोणी
घट युक्त ॥८३॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
No comments:
Post a Comment