Tuesday, 12 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ४१ ते४५ (अभंग८५ते ९४ )






अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५  सच्चिदानंद पदत्रय विवरण  ओव्या ४१  ते४५ (अभंग८५ते ९४ )


कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा ।  
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥
41
सज्ज केल्याविना
वाजविण्या  वीणा  
देण्याआधी काना
तृप्ती कुणा ॥ ८५ ॥

अव्यक्त तो नाद
असतोची तिथे 
जाणार तो  कुठे
सांगा बरे ॥ ८६  
 नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।  
आपणचि भंवरा । होआवे पडे ॥ ५-४२ ॥
किंवा पुष्पगंध
येण्याच्या पूर्वीच  
पुष्प ते स्वतःच
भोगी तया ॥ ८७॥

जणू कि सुमन
होऊनी भ्रमर
आपले अंतर
गंध घेते ॥ ८८ ॥
 नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे ।  
हें पाहणें तें नोहे । आणिकाजोगें ॥ ५-४३ ॥
होण्याच्या पूर्वीच
सुंदर पक्वान  
तयाला ते कोण
चाखणार ॥ ८९ ॥

तयाचा तो रस
जाणावा तेणेच
इतर कोणीच
नसताना ॥ ९०  
 तैसें सुखपणा येवो । लाजे आपुलें सुख पावों ।  
तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ ५-४४ ॥
तैसे सुखपणा
येण्यास लाजते
वेगळी न होते
मुळातून ॥ ९१ ॥

ऐशिया सुखास
कोण शके जाणू
भोगुनिया  वाणू
इतरांना ॥ ९2  
 दिहाचिया दुपारीं । चांदु जैसा अंबरीं ।  
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ ५-४५ ॥
जैसा दिन काळी
दुपार प्रहरी
असतो अंबरी
चंद्र जरी  ॥ ९३   

परी तयाचे ते
चांदणे तयास
नचं इतरास
 कळायचे॥ ९४   

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...